शेअर बाजार गडगडला गुंतवणूकदारांना 1 लाख कोटींचा फटका

956

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात सेन्सेक्सची विक्रमी नोंद करणाऱया मुंबई शेअर बाजारात दुपारच्या सत्रात मात्र गुंतवणूकदारांच्या जोरदार नफावसुलीमुळे मोठी उलथापालथ झाली. सेन्सेक्स दिवसअखेर 416 अंकांनी कोसळला. तो 41,529 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारातही (निफ्टी) 127 अंकांची घसरण होऊन 12,224 अंकांवर स्थिरावला. दरम्यान, मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांना 1 लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचे वृत्त आहे.

कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी सकाळच्या सत्रात शेअर्सची मोठी खरेदी केली. सेन्सेक्सने 300 अंकांनी झेप घेतली. सेन्सेक्सने 42,273 अंकांची विक्रमी नोंद केली, मात्र दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. शेअर्सची मोठय़ा प्रमाणावर विक्री सुरू झाली. सेन्सेक्स तब्बल 416 अंकांनी कोसळला. सेन्सेक्सच्या प्रचंड घसरणीचा फटका गुंतवणूकदारांनाही बसला. सुमारे 1 लाख कोटींचे नुकसान झाले. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 41,529 अंकांवर स्थिरावला होता. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, ओएनजीसी, टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, आयटीसी, एशियन पेंटस्चे शेअर्स वधारले.

घसरणीमागची कारणे

  • सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी, मात्र दुपारनंतर नफेखोरीसाठी विक्रीची चढाओढ.
  • अमेरिका-चीनमधील विकासदर कमी झाल्याने गुंतवणूकदार सावध. युरोपातील बाजार कोसळला.
  • इराण-अमेरिकेतील तणावामुळे खनिज तेलाच्या किमतीमध्ये वाढ. तेलाचा एक बॅरलचा भाव 65 डॉलर्सवर गेला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या