
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. या आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बीएसई आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने बाजार गडगडला. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात 1200 अंकांची घसरण दिसून आली. तर निफ्टीमध्ये 350 अकांची घसरण दिसून आली. शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुतंवणूकदारांना 5 मिनिटात 5 लाखा कोटींचा फटका बसला आहे. सलग सहाव्या दिवशी बीएसई आणि निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. या सहा दिवसात गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
चीनसह जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चीनमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे मंदीचे वातावरण आहे. चीनच्या बाजारपेठेचा परिणाम जागतिक बाजारावर दिसत असून त्याचे परिणाम हिंदुस्थानी बाजारावरही होत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे गुंतवणूकदारांनी भीतीमुळे पैसे काढून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील देशातील जीडीपी वाढीची आकडेवारी शुक्रवारी जाहीर होणार आहे. ही आकडेवारी निराशाजनक असल्याचा अंदाज असल्यानेही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. अर्थतज्ज्ञांच्या मते जीडीपीचा दर 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. या आकडेवारीवरून देशातील विकासाला ब्रेक लागल्याचे संकेत दिसत असल्याने भविष्यातील गुंतवणूकीबाबत साशंकता निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसा काढून घेतला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जागतिक शेअर बाजारावरही विपरीत परिणाम दिसत आहेत. अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज गुरुवारी 1,190.95 अंकांनी घसरला होता. अमेरिकेतील बाजारातील ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. आशियाच्या शेअर बाजारामध्ये शांघाई कंपोजिट, हाँगकाँग, दक्षिण कोरिया,जपान या बाजारामध्येही मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. परदेशी बाजारपेठेतही विक्रीचा सपाटा सुरू असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजारातसह देशातील शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे.

























































