
जागतिक स्तरावर घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींचे पदसाद हिंदुस्थानी शेअर बाजारावर उमटत आहेत. त्यामुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही घसरणीचे सत्र सुरुच राहिले. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांना कोसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 25 हजारांची पातळी तोडून खाली गेला.
बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सेन्सेक्स 945.14 अंकांनी अर्थात 1.15 टक्क्यांनी घसरून 81,235.33 वर पोहोचला होता, तर निफ्टी-50 मध्ये 285.40 अंकांची अर्थात 1.13 टक्के घसरण होऊन तो 24,947.10 वर पोहोचला होता. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा झाले. बातमी लिहिपर्यंत सेन्सेक्स-निफ्टीमध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली होती.
विदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, संमिश्र तिमाही निकाल आणि वाढत्या जागतिक तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे बाजारातील सर्वच सेक्टरमध्ये विक्रीचा सपाटा सुरू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात लाली पसरली आहे. याचा फटका गुंतवणूकदारांना बसत असून गेल्या तीन दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 15 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
बाजारातील पडझडीची कारणे –
– रुपयातील घसरणीमुळे बाजारावर दबाव निर्माण होत आहे. बुधवारी रुपया 31 पैशांनी घसरून एक डॉलरच्या तुलनेत 91.28 या आतापर्यंत विक्रमी निचांकी स्तरावर पोहोचला.
– विदेशी गुंतवणूकदार सातत्याने हिंदुस्थानी बाजारातून पैसा काढून घेत आहेत. मंगळवारी एफऱआयआयने 2938 कोटींचे शेअर विकले. जानेवारी महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी एकूण 32,253 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.
– ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या निकालांनी बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. विशेष करून आयटी सेक्टर आणि खासगी बँकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत.
– जागतिक बाजारातूनही नकारात्मक संकेत मिळत आहेत. टॅरिफ आणि ग्रीनलँडबाबत अमेरिकेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ट्रेड वॉरची भीती निर्माण झाली आहे. त्याचा प्रभाव अमेरिकेसह जगभरातील जागतिक बाजारांवर होत आहे.
– बाजारातील अस्थिरता मोजणारा ‘इंडिया विक्स’ निर्देशांक बुधवारी 4 टक्क्यांनी वाढून 13.22 वर पोहोचला. विक्समध्ये झालेली ही वाढ गुंतवणूकदारांमधील भीती आणि येणाऱ्या काळात बाजार अधिक हेलकावे घेणार असल्याचे संकेत देते.
– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे आणि ग्रीनलँडबाबतची विधाने यामुळे जागतिक राजकारणात अनिश्चितता वाढली आहे. युरोप आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे गुंतवणूकदार इक्विटी मार्केटमधून पैसा काढून सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.






























































