70 सालों में हुआ पहली बार ,रुपया सत्तरी पार!

14

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानी चलन रुपयाची इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. जगाच्या आर्थिक बाजारपेठेत रुपयाचा अक्षरशः बाजार उठला असून, डॉलरच्या तुलनेत 70.9 पर्यंत रुपया ‘ऑल टाईम लो’ गेला आहे. या घसरणीचा परिणाम हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘ 70 सालों में ऐसा पहिली बार हुआ’. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखविले अशी टीका सर्वत्र होते आहे.

गेल्या काही आठवडय़ांपासून रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण 69.93 पर्यंत गेली होती. मंगळवारी सकाळी 16 पैशांनी रुपया आणखी घसरला. एक डॉलरसाठी तब्बल 70 रुपये 9 पैसे मोजण्याची वेळ आली. आजवर देशात रुपयाचे अवमूल्यन एवढे कधीच झाले नव्हते.

मोदींनी अखेर करून दाखविले

रुपयाची ‘ऐतिहासिक निच्चांकी घसरण झाली. सुप्रिम लिडर (पंतप्रधान) विरोधात रुपयाने अविश्वास दाखविला आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर  पंतप्रधान होण्यापूर्वी मोदींनी रुपयाच्या घसरणीबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ अपलोड केला आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही हल्ला चढविला आहे. 70 वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते मोदींनी केले आहे. 56 इंच छातीपेक्षा जास्त रुपया खाली घसरला आहे, अशी टीका सिब्बल यांनी केली. रुपयाचा बाजार उठवण्यामागे आंतरराष्ट्रीय घटक जबाबदार असून चिंता करण्याचे कारण नाही, डोन्ट वरी असे केंद्रीय सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या