
सध्या बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री गर्भवती असल्याच्या बातम्या येत आहेत. करीना कपूर खान, अनुष्का शर्मा, सागरिका घाटगे, अनिता हंसनंदानी अशा अभिनेत्रींच्या घरी पुढील वर्षी चिमुकल्यांचे आगमन होणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतही धनश्री काडगावकर या अभिनेत्रीने आपल्याकडे गोड बातमी असल्याची माहिती काही काळापूर्वी दिली होती. अभिनेता आरोह वेलणकर यानेही त्याची पत्नी गर्भवती असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. आता या यादीत एका अभिनेत्याची भर पडणार आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला श्री अर्थात शशांक केतकर याच्या घरी गोड बातमी आहे.
शशांक आणि त्याची पत्नी प्रियांका हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. शशांकने स्वतः इन्स्टाग्राम पोस्ट करून ही बातमी दिली आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रियांका आणि शशांक हे दोघेही 2017मध्ये विवाहबद्ध झाले होते.



























































