
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून थरूर आणि पक्ष नेतृत्वामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, या भेटीनंतर थरूर यांनी या चर्चांना केवळ ‘अफवा’ ठरवत आपण सर्व एकाच विचाराने पुढे जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
संसदेतील मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात ही बैठक सुमारे एक तास चालली. या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाळ देखील उपस्थित होते. या भेटीनंतर शशी थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक फोटो शेअर करत माहिती दिली.
‘काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. आम्ही सर्वजण एकाच विचाराने (On the same page) देशाच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत’, असे थरूर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

वादाच्या चर्चांना बगल
काही दिवसांपूर्वी कोची येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी थरूर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच केरळमधील स्थानिक नेत्यांकडून डावलले जात असल्याची भावना थरूर यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी स्पष्ट केले की, पक्षात काही अंतर्गत विषय असू शकतात, परंतु ते जाहीरपणे मांडण्यापेक्षा नेतृत्वाशी थेट बोलणे योग्य आहे. ‘माझ्या स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना भेटण्यात असामान्य काय आहे?’ असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
‘ऑपरेशन सिंदूर’वर ठाम
दरम्यान, केरळ साहित्य उत्सवात बोलताना थरूर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ वरील आपल्या भूमिकेचे समर्थन केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर देणे गरजेचे होते आणि मी नेहमीच त्या भूमिकेचे समर्थन केले आहे’, असे त्यांनी सांगितले.
shashi tharoor meets rahul gandhi mallikarjun kharge refutes rift rumors
congress mp shashi tharoor met rahul gandhi and mallikarjun kharge in parliament to clear the air on rift rumors. tharoor said they are on the same page.



























































