विलिनीकरण करून अजित पवार यांच्याकडे नेतृत्व द्यायचं ठरलं होतं, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करून अजित पवार यांच्याकडे नेतृत्व दिले जाणार होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.

28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी केला होता. पण अजित पवार गटातील नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा इन्कार केला होता.

आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात लेख लिहून मोठे विधान केले आहे. साप्ताहिकातील लेखात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. विलिनीकरणानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असे त्यांनी नमूद केले.

दादांचे ते स्वप्न अपूर्ण राहिले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता ती जबाबदारी आपलीच असून दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मन मोठे करून प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.