काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा पक्षाविरोधातच प्रचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी लखनौमध्ये आपल्याच पक्षाविरोधात प्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज असून त्यांनी सिन्हा यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाने पाटणासाहिबमधून उमेदवारीही दिली. तर त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा समजावादी पक्षाकडून लखनौमधून निवडणूक लढवत आहेत. एकीकडे पक्ष आणि दुसरीकडे पत्नी अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या शत्रुघ्न यांनी पत्नीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचे नेते त्यांच्यावर नाराज आहेत. शत्रुघ्न यांनी पतीधर्मापेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य द्यावे असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.

पूनम सिन्हा लखनौमधून उमेदवारी अर्ज भरताना शत्रुघ्न सिन्हा त्यांच्यासोबत होते. तसेच त्यांच्या प्रचारासाठी ते लखनौमध्ये रोड शोमध्येही सहभागी झाले होते. आता ते समाजवादी पक्षाच्या मंचावर पूनम यांच्या प्रचारासाठी आले होते. या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेसविरोधी प्रचार करत सपा-बसपा आघाडीसाठी मते मागितली. तसेच या सभेत त्यांनी अखिलेश यादव आणि मायावती यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. देशाचा पंतप्रधान अखिलेश किंवा मायावती यांच्यासारखा असायला हवा असे ते म्हणाले. त्यांनी उत्तर प्रदेशात चांगले काम केले आहे असेही ते म्हणाले.

शत्रुघ्न यांनी लखनौमध्ये पूनम सिन्हा यांचा प्रचार केल्याने येथील काँग्रेसचे उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णन यांनी शत्रुघ्न यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शत्रुघ्न यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी मनाने ते दुसऱ्याच पक्षात आहेत. त्यांनी आता पक्षनिष्ठेचे पालन करत काँग्रेसच्या आणि आपल्या प्रचारासाठी यावे असे आवाहन केले आहे. मात्र, शत्रुघ्न यांनी कृष्णन यांच्या विधानाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शत्रुघ्न सिन्हा भाजपमध्ये असताना त्यांनी पक्षाविरोधात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीका करून पक्षाला अडचणीत आणले होते. आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर ते पक्षाविरोधात प्रचारासाठी उतरल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.