शेख हसीना यांना 10 वर्षांचा कारावास, सरकारी भूखंड लाटल्याचा ठपका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी साधनसंपत्तीचा दुरुपयोग व भूखंड वाटपातील घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने हा निकाल दिला.

ढाक्याजवळच्या पूर्बाचल येथील राजूक न्यू टाऊन प्रकल्पात शेख हसीना यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पदाचा गैरवापर करून व अधिकाऱ्यांशी संगनमत करून हसीना यांनी आपल्याच कुटुंबातील अनेकांना भूखंडाचे वाटप केले होते. लाभार्थ्यांमध्ये त्यांची पुतनी व ब्रिटनमधील लेबर पक्षाची खासदार टयूलीप सिद्दिक, अजमीना सिद्दिक, पुतण्या रादवान मुजीब सिद्दिक याचा समावेश आहे. त्यांनाही दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अन्य दोषींमध्ये माजी गृहनिर्माण राज्यमंत्री, गृहनिर्माण सचिव, गृहनिर्माण प्रकल्पाच्या अध्यक्षाचा समावेश आहे.

हे राजकीय षड्यंत्र – आवामी लीग

बांगलादेशात पुढील आठवडय़ात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा निकाल देण्यात आला आहे. शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाने या निकालावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘हसीना यांच्या विरुद्ध चालवण्यात आलेले सगळे खटले खोटे आहेत. शिक्षा आधीच ठरवून नंतर न्यायालयात सुनावण्या घेण्यात आल्या. यामागे राजकीय षड्यंत्र आहे’, असा दावा आवामी लीगने केला आहे.