
बांगलादेशच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्याच्या अंतरिम सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेला कडाडून विरोध दर्शवला आहे. या निवडणुका पूर्णपणे अवैध आणि असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.
शेख हसीना यांनी म्हटले आहे की, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने देशातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली असून, अवामी लीगसारख्या मोठ्या लोकशाहीवादी पक्षाला निवडणुकीच्या रिंगणातून जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्यात आले आहे.
शेख हसीना म्हणाल्या आहेत की, ज्या पद्धतीने या निवडणुका पार पडल्या, ती लोकशाहीची थट्टा असून केवळ एका विशिष्ट विचारसरणीला सत्तेत बसवण्यासाठीचा हा कट होता. मोहम्मद युनूस यांनी सत्तेचा गैरवापर करून विरोधी आवाजाची गळचेपी केली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेला आणि हिंसाचाराला हे अनधिकृत सरकारच जबाबदार असून, जोपर्यंत संविधानाच्या चौकटीत राहून आणि सर्व पक्षांना समान संधी देऊन निवडणुका घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत या प्रक्रियेला कोणतेही कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होणार नाही, अशी भूमिका हसीना यांनी मांडली आहे.


























































