एक शेर सुनाता हूं

1622

>> शिरीष कणेकर

परवा अचानक मला ‘शेर’ झाला. आम्हा प्रतिभावंतांचं हे असंच असतं. कधी काय होईल सांगता येत नाही. मूळव्याध, नखुरडं, गलगंड, पाठदुखी हे सगळे पण मला पूर्वसूचना न देता असेच झाले होते. आता या शेराचंच बघा. मी शायर नाही. माझ्यापेक्षा हे तुम्हाला जास्त माहीत. पण परवा मी (उरलेले) दात कोरत कतरिनाचं कोणाशी लग्न लावून द्यावं या गहन विचारात मढलेलो असताना एकाएकी मला शेर झाला. पहिला विचार माझ्या मनात आला तो हा की ‘शेर’ घरात ठेवायला सरकारची परवानगी लागते का? नसावी; नाहीतर मिर्झा गालिबपासून सुरेश भटांपर्यंत सगळय़ा शायरांचं आयुष्य सरकारदरबारी खेटे घालण्यातच गेलं असतं. मी शायर नसल्यानं ‘सेफ’ होतो. माझे न हसवणारे विनोद कायद्याच्या क्षेत्रात येत नव्हते.

शायर नेहमी बिगडे दिल असतात. त्यांची खुबसूरत प्रियतमा नेहमी त्यांच्यापासून दूर गेलेली असते. (आम्हाला खुबसूरत प्रियतमाच नसल्यानं ती जवळ असण्याची वा दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.) या सगळय़ा नामचिन शायरांची लग्नाची बायको त्यांची कधी स्फूर्तिदेवता नसते हे मी ‘मार्क’ केलंय. या बाबतीत मात्र माझं शायरांशी साम्य आहे. तेवढी खुबसूरत मदनिका भेटली असती तर मी गालिब, मीर, दाग प्रभृतींच्या पंक्तीत बसलो असतो व पूर्णवेळ शायर म्हणून जगलो असतो. शिरीष खाँ माहीमवाले हे नाव कसं वाटतं? (‘कणेकर’पेक्षा कुठलंही आडनाव चांगलां वाटेल म्हणा. ‘मुस्कटदाबे’ असं आडनाव असतं का हो? नसावं. असतं तर बहुसंख्य नवऱयांनी हे स्वखुशीने घेतलं असतं.) माझ्या एका मित्राचं आडनाव शेंबडे आहे. त्याला चालत असेल पण त्याच्यापायी त्याची बायको वनिता समाजात ‘शेंबडी’ म्हणून ओळखली जाते त्याचं काय? अपशब्द न उच्चारता त्याचं नुसतं नाव घेऊन आम्हाला त्याला शिवी घातल्याचा आनंद मिळतो. पुढेमागे ‘कणेकर’ या माझ्या आडनावाचा उपयोग शिवी म्हणून केला जाणार नाही ना? दिल सोचता है वो दुश्मन भी नहीं सोचता! (मन चिंती ते वैरी न चिंती!)

शायर होण्यासाठी मजबूत दारू पिणं ही पूर्वअट आहे. दारूला न शिवणारा माणूस मोठा शायर झाल्याचं ऐकिवात नाही. (मी झालो तर तो पहिलाच असेन.) शायरीत नशा यायला हवी असेल तर त्यासाठी आधी नशापाणी करणे आवश्यक आहे अशी बहुसंख्य शायरांची धारणा दिसते. त्याच्या दारूबाजीवर झोड उठवणाऱयांना तो म्हणतो,-
हंगामा है क्यू बरपा
थोडीसी जो पी ली है
डाका तो नहीं डाला
चोरी तो नहीं की है
असं काय केलंय मोठंसं? येऊन जाऊन दारूच तर प्यायलोय ना? चोरी केल्यासारखा किंवा डाका घातल्यासारखा गहजब काय करताय?
हा शायर काय म्हणतोय बघा,
कौन कहता है के शराब में नशा है
गर शराब में नशा होती तो बोतल न नाचती?
दारूनं भरलेली बाटली ‘सोबर’ असते आणि हा बेटा मात्र दोन घोट पोटात गेल्यावर नाचायला लागतो.
प्रेयसीच्या शराबी नजरेत नजर मिसळून पाहिलं तरी नशा येत असेल तर त्यालाही संस्कृती संरक्षकांची हरकत असणार आहे का? विद्वत्ता, यश इतकंच नव्हे तर निःस्पृहता व रामशास्त्री बाणा यांचीही नशा डोक्यात जाऊ शकते. निर्व्यसनीपणा व चारित्र्यसंपन्नता यांची मला नशा आहे. अन्य स्खलनशील माणसांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, हा विचार माझं डोकं धुंद करतो, पण ही नशा दरवेळी माणसाला कवी किंवा शायर करीलच असे नाही.
‘बॉबी’मध्ये ऋषी कपूरच्या तोंडून शैलेंद्र सिंगच्या आवाजात कवी आनंद बक्षी म्हणतो-
मैं शायर तो नहीं
मग ऐ हसीन
जबसे देखा मैंने तुझको
मुझको शायरी आ गयी
हे असं माझ्या आयुष्यात व्हायला काय हरकत होती? पण नाही, मी बोरिवलीच्या बस स्टॉपवर उभा असलो तर ती त्याच वेळी कुलाब्याच्या बस स्टॅपवर उभी राहत असावी. तिथून ती नक्की आतडं पिळवटून गात असणार,
मैं सागरी की मस्त लहर
तू आसमान का चाँद
मिलन हो कैसे?
मिलन हो कैसे?
कोणीतरी हे गाणं ऐकलं असावं व ‘धुवाँ’ या चित्रपटात टाकलं असावं. चोर लेकाचे.
अरे हो, मला झालेला शेर सांगायचा राहूनच गेला. असा कसा राहून जाईल? मी ते मुद्दामच मागे ठेवला होता. आम्हा कलमनवाजांचे चाळे तुम्हा साध्याभोळय़ा वाचकांना कसे कळणार? चिंपाझीच्या वरताण आम्ही उलटय़ा सुलटय़ा उडय़ा मारतो.
तर हा तो माझा पहिला व शेवटचा ‘ओरिजिनल’ शेर,
मौत और उम्र का गहरा रिश्ता है
हम मर क्या गये, उम्र ने बढना ही छोड दिया

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या