शेवगाव नवीन बसस्थानकाचे काम पूर्ण कधी होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेवगाव येथील नवीन बसस्थानकाचे काम कासवाच्या संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींसह महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनाही त्याचे सोयरसुतक दिसत नसल्याने बसस्थानकाचे काम पूर्ण कधी होणार, हा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

नगर जिल्ह्याला मराठवाड्याशी जोडणारे मध्यवर्ती केंद्र म्हणून शेवगावची ओळख आहे. त्यामुळे शेवगाव बसस्थानकात प्रवाशांची सतत मोठी गर्दी असते. जिल्ह्यात शेवगाव डेपोची निर्मिती सर्वांत पहिल्यांदा झाली. या आगारातून दिवसभरात तालुक्यातील गावांसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, बारामती, कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ आदी लांब पल्ल्याच्या 250 वर बसफेऱया सुरू आहेत.

दररोज या बसस्थानकांतून महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱया प्रवाशांसह जवळपास 25-30 हजार लोक प्रवास करतात. शेवगाव आगाराला विक्रमी उत्पन्न मिळत असून, मागील जून महिन्यात 2 कोटी 96 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अधिकारी-कर्मचाऱयांच्या सामूहिक प्रयत्नातून देखभाल दुरुस्ती खर्चात बचत झाल्याने आगारास तीन लाख रुपयांचा नफा मिळाला. ही बाब आगारातील अधिकारी-कर्मचाऱयांसाठी भूषणावह असली तरी गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आगाराच्या बांधकामास विलंब होत असल्याने प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे.

या बसस्थानक परिसरात बसण्यासाठी बाके उपलब्ध नसल्याने अनेकांना ऊन, वारा, पावसात तिष्ठत उभे राहावे लागते. तसेच डेपोतून आलेली बस जेथे मोकळी जागा उपलब्ध असेल तेथे उभी राहत असल्याने ती बस नेमकी कोठे जाणार, याची माहिती नसल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ उडतो. अनेकदा त्यांच्या बसेस चुकतात. त्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतात. शाळा सुटल्यानंतर बसस्थानकाला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आल्याचे दिसते. ग्रामीण भागातील मुलांना गावी जाण्यासाठी कमी बस उपलब्ध असल्याने त्यांना धावतपळत जाऊन बस पकडावी लागते. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत.

शेवगाव बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ मार्च 2020 मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते पार पडल़ा मात्र, तीन वर्षांनंतरही हे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याबाबत संबंधितांनी लक्ष घालून कोणत्याही परिस्थितीत नवीन बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण होईल व प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, अशी मागणी त्रस्त प्रवाशांतून होत आहे.