शिवलिंगाला जलाभिषेक घालून शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणरणत्या उन्हात डोंगरकपारींच्या मधून अवजड अशा कावडी घेऊन ‘म्हाद्या धाव… म्हाद्या पाव’, ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत शिवभक्तांनी आज शिखर शिंगणापूर येथील अवघड असा मुंगी घाट सर केला. यानंतर मानाच्या कावडींमधील जलाने शिवलिंगाला अभिषेक घालून यात्रेची सांगता झाली. दरम्यान, मुंगी घाट सर करतानाचा थरार आणि नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या कावड यात्रेला शिवमंदिरात गुढी उभारून सुरुवात झाली होती. हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ध्वज बांधण्यात आला. त्यानंतर इंदूरचे काळगौडाराजे यांनी शिव-पार्वतीचे दर्शन घेतले. त्यानंतर अवघड मुंगी घाटातून कावडी वर चढण्यास सुरुवात होते. त्यानुसार आज मुंगी घाटातून कावडी वर येऊ लागल्या.

शिखर शिंगणापूरचा डोंगर हा सह्याद्रीच्या डोंगररांगांतील अखेरच्या टप्प्यातील म्हणून ओळखला जातो. अतिउंच असलेला मुंगी घाट या डोंगरात आहे. खळद, एकतपूर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ या पंचक्रोशीमधून मोठय़ा प्रमाणात कावडी येतात. खळद येथील निवृत्ती महाराज खळदकर, सासवड येथील काशिनाथ कावडे, संत तेली भूतोजीबुवा या मानाच्या कावडी कोथळे भागात आज दुपारी पोहोचल्या.

कावडींपुढे भाविकांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी या कावडींचे औक्षण करण्यात येत होते. तांब्याचे दोन हंडे, त्यावर उंच झेंडा, त्याला विविध रंगांचे कपडे लावून सजविण्यात आले होते. कावड समांतर राहण्यासाठी त्याला सर्व बाजूंनी दोऱ्याही लावण्यात आल्या होत्या. कावडी हळूहळू पुढे सरकत होत्या. अनेक लहान लहान कावडींनी चढाई सुरू केली होती. कावडींनी पहिला टप्पा चढल्यावर सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. दुसरा टप्पाही भरउन्हात सरसर चढला जात होता. हे दोन टप्पे थोडे कमी उंचीचे असल्याने लवकर सर झाले.

शिवभक्तांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. मात्र, हे सगळे विसरून देवाच्या भेटीसाठी सर्वजण आसुसलेले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संत तेली भूतोजीबुवा यांची कावड मुख्य मार्गावर दाखल झाली. त्या कावडीने मुंगी घाटाचा प्रवास सुरू केला. यावेळी ‘हर हर महादेव’चा गजर सुरू होता. भरदुपारी या डोंगरातून हजारो भाविक हा थरार पाहण्यासाठी जागा मिळेल तेथे बसून होते.

सायंकाळी उशिरा दोरखंड आणि मानवी साखळीच्या आधारे या कावडी मुंगी घाटातून वर आल्या. पाच वाजेपर्यंत अनेक कावडी वर आल्या होत्या. सायंकाळी उशिरा मानाची संत तेली भूतोजीबुवा यांची कावड दुसऱ्या टप्प्यावर आली होती. अंधार होऊनसुद्धा ही कावड पाहण्यासाठी भाविक थांबून होते. अखेर रात्री उशिरा या सर्व कावडी घाट सर करून वर आल्या. राजमाता कल्पनाराजे यांच्या उपस्थितीत कावडधारकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कावड मिरवणुकीपुढे ढोल-ताशे, सनई, हलगीचा गजर सुरू होता. कावड खांद्यावर घेऊन नाचविली जात होती. यानंतर कावडी महादेवाच्या मंदिरात दाखल होऊन कावडींमधून नीरासह पाच नद्यांमधून आणलेल्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला.

दरम्यान, यात्राकाळात उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, बॉम्बशोधक पथकाने सर्वत्र शोधमोहीम राबविली.