ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. एका सराफ व्यावसायिकाने सोने गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्याने शिल्पा, राज आणि अन्य काही लोकांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. शिल्पा आणि राज यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.
मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी हे आदेश दिले आहेत. शिल्पा आणि राज यांच्या विरोधात वांद्रे कुर्ला येथील सराफा व्यवसायिक पृथ्वीराज सरेमल कोठारी यांनी तक्रार केली आहे. कोठारी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, कुंद्रा दांपत्याने 2014मध्ये एक योजना सुरू केली होती. त्यात गुंतवणूकदारांनी अर्ज करण्यापूर्वी सवलतीच्या दराने सोन्याचे आगाऊ पैसे भरण्यास सांगण्यात आलं होतं. योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या किमतीचे सोने गुंतवणूकदारांना मिळणार होते.
कोठारी यांनी या योजनेत 2 एप्रिल 2019 रोजी 5 हजार ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोने दिले जाईल, या विश्वासावर पंचवार्षिक योजनेअंतर्गत 90 लाख 38 हजार 600 रुपये इतकी गुंतवणूक केली होती. मात्र, पाच वर्षं पूर्ण होऊनही दिलेल्या आश्वासनानुसार ठरलेलं सोनं देण्यात आलं नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार बोगस असल्याचा आरोप कोठारी यांनी केला आहे. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी पोलिसांना दिले आहेत.