वेलिंग्डन क्लबच्या भाडेपट्टय़ाच्या नूतनीकरणाच्या बदल्यात मिंधे सरकारने 50 जणांना क्लबचे सभासदस्यत्व देण्याची मागणी केली आहे. भाडेपट्टय़ाच्या नूतनीकरणाच्या बदल्यात राज्य सरकारने क्लबकडे केलेली सभासदस्यत्वाची मागणी ही सरकारने घेतलेल्या लाचेसारखी आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केला आहे. या लाचखोरीबाबत त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र दिले असून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स व वेलिंग्डन क्लबबाबत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रेसकोर्सची जमीन ताब्यात घेऊन बिल्डर मित्रांच्या घशात घालत असल्याचा डाव असल्याचे निदर्शनास आणले होते. आता याबाबत त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. महाराष्ट्राचे राज्य रमेश बैस यांना पत्र लिहून महालक्ष्मी रेसकोर्स व वेलिंग्डन क्लबबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्री व भाजपचा हस्तक्षेप थांबवावा अशी विनंती केल्याचे एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.
राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटलेय…
वेलिंग्डन क्लबमध्ये मागितलेले 50 जणांचे सभासदत्व ही जणू भाडेपट्टीचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या लाचेसारखी आहे, रेसकोर्सचा आराखडा नागरिकांना आणि सदस्यांना दाखवणार असल्याचे शासनाकडून न्यायालयात सांगण्यात आले होते.
तथापि आता अधिकृतपणे जमीन ताब्यात घेऊ पाहात आहे आणि काम सुरू करण्याचा विचार करीत आहे. ही जमीन बळकावून ते काम घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपच्या बिल्डर कंत्राटदार मित्रांना सोपवायचा मनसुबा आहे.