दहिसरमध्ये मिंधे गट–भाजपमध्ये राडा; बॅनरवरून कार्यकर्ते भिडले

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या बॅनरवरून मिंधे गटाच्या शाखाप्रमुखासह सात जणांनी भाजपच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना दहिसर येथे घडली. बिभीषण वारे असे जखमी भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. मारहाणप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बिभीषण वारे हा भाजपचा कार्यकर्ता आहेत. वारे याचा मित्र नावडकर याने नुकताच भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता. पक्षप्रवेशाचा बॅनर दहिसरच्या अशोकवन जंक्शन येथे लावला होता. दोन दिवसांपूर्वी आमदार सुर्वे यांच्या आमदार निधीतून होणाऱया विकासकामांचा बॅनर तेथेच लावला होता. शनिवारी सायंकाळी तो कार्यक्रम संपल्याने वारे याने तो बॅनर काढून विभूती नारायण शाळेजवळ लावला.

रात्री सवाअकराच्या सुमारास वारे हा मित्रांसोबत गप्पा मारत होता. तेव्हा मिंधे गटाचे शाखाप्रमुख सुनील मांडवे हे तेथे आले. त्यांनी सुर्वेंचा बॅनर लावण्यास सांगितले. त्या बॅनरच्या वादातून सात जणांनी वारे याला लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. हल्ल्यात जखमी झालेल्या वारे याने तेथून पळ काढला.  वारे याने दिलेल्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच दोघांना पोलिसांनी अटक केली. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

सूत्रधाराला उद्यापर्यंत अटक करा! – नीलम गोऱ्हे

दहिसरमधील एका लोकप्रतिनिधीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. एक डीएनएची, दुसरी घटना चित्रफितीची आणि आता सीसीटीव्हीतून हल्ल्याची तिसरी घटना समोर आली आहे. दहिसरमध्ये भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यामागे कोणी ना कोणी सूत्रधार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या हल्लामागे असलेल्या टोळक्याच्या सूत्रधाराला उद्यापर्यंत अटक करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले. दरम्यान, हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करण्यात येईल, असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या वतीने सांगितले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार अॅड. अनिल परब यांनी आज परिषदेत माहितीचा मुद्दा उपस्थित केला.