
पालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना ठाण्यात शिंदे गटाच्या उमेदवारांना चक्क मतदारांनी रोखले असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रचार रॅली सुरू असताना हा प्रकार घडला. १० वर्षांत तुम्ही काय केले? निवडणूक आल्यानंतर गाजर दाखवता नंतर पाच वर्षे गायब होता.. या आशयाचे पोस्टर हातात घेत शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदारांनीच आता जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
ठाण्यात युतीचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शिंदे गटाच्या काही माजी नगरसेवकांनी उत्साहाच्या भरात प्रचाराला सुरुवात केली. पुन्हा उमेदवारी मिळेल या आशेवर माजी नगरसेवकांनी प्रभागात प्रचार सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील लोकमान्यनगर पाडा नंबर १ येथे शिंदेंच्या माजी नगरसेवकांनी रविवारी प्रचार रॅली काढली. मात्र स्थानिक नागरिकांनी रॅली अडवत थेट माजी नगरसेवकांना जाब विचारला. हातात निषेधाचे पोस्टर घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले असल्याचे पाहून शिंदेंच्या उमेदवारांनी काढता पाय घेतला.

























































