वाचनालयावर कार्यालयाचा बोर्ड लावणाऱ्या शिंदे गटाला शिवसैनिकांचा दणका

shivsena

सार्वजनिक वाचनालयावर कार्यालयाचा बोर्ड लावणाऱ्या शिंदे गटाला शिवसैनिकांनी मनोरमानगरात आज दणका दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी वृत्तपत्र वाचनालय असलेल्या या जागेत अनधिकृतरीत्या कार्यालय थाटण्याचा शिंदे गटाचा डाव शिवसैनिकांनी उधळून लावला. या प्रकारानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाण्याच्या मनोरमानगर येथे शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नावाने असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे तत्कालीन आमदार राजन विचारे यांनी उद्घाटन केले होते. या वाचनालयात परिसरातील वृद्ध नागरिक, तरुण, विद्यार्थी वृत्तपत्र वाचनासाठी नियमित येतात. मात्र शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी या वाचनालयाच्या दर्शनी भागात कार्यालयाच्या नावाने फलक लावला. याच फलकावर पुन्हा एकदा सार्वजनिक वाचनालयाचा फलक आज निष्ठावंत शिवसैनिकांनी झळकवला. शिवसेना खासदार राजन विचारे यांनी याठिकाणी भेट देत शिवसैनिकांशी चर्चा केली. यावेळी विभागप्रमुख चंद्रकांत कचरे, प्रदीप पूर्णेकर, उपशहरप्रमुख संतोष शिर्पे, शाखाप्रमुख अनंत जाधव, सागर ढवळे आदी उपस्थित होते. मात्र निष्ठावंतांनी फलक झळकताच’शिंदे गटाला’ चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्यांनी या ठिकाणी येत धिंगाणा घातला. मात्र परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.