
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असतानाच बॅनर्स जाणूनबुजून झाकण्यावरून जोरदार वाद उफाळला. शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच आज जोरदार घोषणाबाजी केली. भाजप व शिंदे गटामध्ये बाचाबाची झाल्याने डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
कुंभारवाडा परिसरातील गणेश घाट उद्घाटनासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी व घोषणाबाजी केली. तसेच शक्तीप्रदर्शन करण्याचाही प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असूनही शिंदे गट व भाजपमध्ये तुंबळ घोषणायुद्ध रंगले. विकास म्हात्रे व कविता म्हात्रे यांच्या स्वागताचे बॅनर भाजपच्या लोकांनी जाणूनबुजून झाकल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले.



























































