
राज्यात सर्वत्र फुटीचे राजकारण सुरू असताना त्यात आता आदिवासींनाही ओढण्याचा डाव आखण्यात आला आहे. मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने पालघरमध्ये आदिवासी एकता परिषद व भूमीसेनेच्या वतीने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र त्याचाही गैरवापर करीत आदिवासींमध्येच फूट पाडण्याचा डाव शिंदे गटाने आखला आहे. शिंदे यांच्या मर्जीतील विश्वास फाऊंडेशनच्या वतीने वेगळा कार्यक्रम ठेवल्याने स्थानिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी पालघरमध्ये एकता परिषद तसेच रॅली व अन्य कार्यक्रम होत असतात. या दिवशी आदिवासींची लोककला, संस्कृती याचेही दर्शन घडवले जाते. उद्या रॅलीदेखील निघणार आहे. आदिवासी एकता परिषद व भूमीसेनेचे संस्थापक अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी पालघर जिल्ह्याच्या विविध भागातून असंख्य आदिवासी बांधव उपस्थित राहणार आहेत.
अशीही सारवासारव
एकीकडे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले असताना एकनाथ शिंदे यांच्या गटातील विश्वास वळवी यांनी स्वत:च्या फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वतंत्र कार्यक्रम ठेवला आहे .या कार्यक्रमाला स्वतः शिंदे उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र आता ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणारा असल्याचे सांगण्यात आले. आम्ही राजकारण करत नाही किंवा कोणतीही वेगळी रॅली काढणार नसून फक्त आदिवासी समाजातील काही मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी स्टेज उभारले असल्याचा दावा विश्वास वळवी यांनी केला आहे, पण प्रत्यक्षात आदिवासी समाजामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यात केली जात आहे.























































