शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी व परिसरातील धार्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
शिर्डी विमानतळ कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशीष येरेकर, शिर्डी विमानतळ संचालक गौरव उपश्याम उपस्थित होते.
मोदी म्हणाले, शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे साईभक्तांना सुविधा मिळणार आहेत. यामुळे शिर्डी, शनिशिंगणापूर व आजूबाजूच्या परिसरातील भक्तांच्या संख्येत वाढ होऊन राज्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. कार्गो कॉम्प्लेक्समुळे शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर व नाशिक परिसरातील कांदा,
द्राक्ष, शेवगा, पेरू व डाळिंब उत्पादक शेतकऱयांचा कृषी माल देश-विदेशात निर्यात होईल, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळामुळे शिर्डी एमआयडीसीतील उद्योगांना चालना मिळणार आहे. आजपासून शिर्डी विमानतळाचे नाव ‘साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट’, असे नामकरण करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.