मुंबई -साईनगर (शिर्डी फास्ट पॅसेंजर)चा वर्धापन दिन उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर येथील रेल्वेस्टेशन दौंड, विसापूर, बेलवण्डी, श्रीगोंदा, नगर, राहुरी, श्रीरामपूर, पुणतांबा, शिर्डी येथे दररोज नोकरी निमित्त मुंबई -साईनगर (शिर्डी फास्ट पॅसेंजर)ने प्रवास करणाऱ्या एम.एस.टी.धारकांनी सालाबादप्रमाणे वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. सदर गाडी दररोज नियमित सुरु असल्यामुळे आपल्या कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, कामगार यांची सोय झाल्याने दरवर्षी हा उपक्रम एम.एस.टी.धारक प्रवाशी आनंदाने साजरा करतात .

प्रथमतः सकाळी स्टेशनवर आलेल्या प्रवाशांना नेमका काय कार्यक्रम आहे? हे समजले नाही. परंतु संयोजकांनी माहिती दिल्यानंतर अनेक प्रवाशानी कार्यक्रमाच्या संयोजकांना शुभेच्छा दिल्या. तसेच या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

मुंबई -साईनगर (शिर्डी फास्ट पॅसेंजर)गाडी नगर रेल्वेस्थानकात दाखल होताच एम.एस.टी.धारकांनी इंजिनला विविधरंगी आकर्षक असे फुलांनी तयार केलेले तोरण बांधून रेल्वेचे स्वागत केले..तसेच रेल्वेच्या डब्यांना फुगे लावून आकर्षक सजवले होते हे पाहून प्रवाशी व रेल्वे कर्मचारी आनंदी झाले. या गाडीचे चालक, गार्ड, तिकीट तपासणीस अधिकारी, स्टेशन उपप्रबंधक, जी आर पी व आरपीएफ रेल्वे पोलीस तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत गोवर्धन पांडुळे यांनी केले. अतिक शेख यांनी सूत्रसंचलन केले तर आभार बाळासाहेब सुंबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम. एस. टी. धारकांनी परिश्रम घेतले. तसेच दरवर्षी वर्धापन दिन असाच साजरा केला जाईल याची ग्वाही संयोजकांनी दिली.