सामना ऑनलाईन । शिर्डी
शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला गुरुवारी पहाटे काकड आरतीने सुरूवात होणार आहे. गुरूपोर्णिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी दर वर्षी लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. त्यामुळे साईबाबा संस्थानानेही गुरूपोर्णिमा उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. साईसमाधी मंदिर, गुरूस्थान, द्वारकामाई, चावडीला आकर्षक फुलांनी सजवलं आहे. साईनामाचा गजरात राज्यभरातून साई बाबांच्या पालख्या शिर्डीकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
गुरूपौर्णिमा उत्सवादरम्यान साईबाबांच्या दान पेटीत सोने, चांदी, हिरे माणिक यासह रोख रकमेचे करोडो रुपयांचे दान भावीकांकडून अर्पण केलं जात असतं. अशाच एका मुंबईतील साईभक्ताने शुक्रवारी साईचरणी ७८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असून या मुकूटाची किंमत २२ लाख रुपये आहे. गुरूपौर्णिमा उत्सवा दरम्यान हाच मुकुट मुर्तीला परिधान करण्यात येणार असल्याचे संस्थानाकडून सांगण्यात येत आहे.




























































