
श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना भेट दिलेल्या नऊ चांदीच्या नाण्यांवरून सध्या मोठा वाद पेटला आहे. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये या नाण्यांच्या मालकीवरून दावे-प्रतिदावे सुरू असून, यामुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या चौकशी अहवालामुळे हा वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
सन 1918 साली विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी महासमाधी घेतली. त्यांच्या अखेरच्या काळात सेवा करणाऱ्या भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी चांदीची नऊ नाणी भेट दिली होती. आता याच नाण्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
खरी नाणी आमच्याकडेच! – अरुण गायकवाड
– ‘साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट’चे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी दावा केला आहे की, धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात नऊ नाणी त्यांच्या अध्यक्षतेखालील ट्रस्टकडे असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चौकशीवेळी प्रतिवादी हजर नसल्याने सहायक धर्मादाय आयुक्तांनी त्यांचा दावा योग्य ठरविला आहे. अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलेजा गायकवाड यांचे चिरंजीव आहेत. शैलेजा गायकवाड या लक्ष्मीबाई यांची मुलगी सोनबाई यांच्या कन्या आहेत. 1963मध्ये लक्ष्मीबाई यांच्या निधनानंतर ही नाणी मुलगी सोनबाई आणि त्यानंतर शैलेजा गायकवाड यांच्याकडे आली. अरुण गायकवाड यांच्या मते, त्यांच्याकडील नाणीच खरी आहेत आणि साईभक्तांना ती दाखवून ट्रस्ट देणग्या जमा करीत असल्याचा आरोप चुकीचा आहे.
आम्हीच खरे वारसदार – संजय शिंदे
– याउलट लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी अरुण गायकवाड यांचा दावा खोटा ठरविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली नाणी त्यांच्या जुन्या घरी असलेल्या मंदिरात आजही आहेत आणि तीच खरी नाणी आहेत. ते स्वतःला लक्ष्मीबाई शिंदेंचे वारसदार मानतात आणि वारसाहक्काने ही नाणी त्यांच्याकडेच असल्याचे सांगतात. धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेताना आम्हाला हजर राहण्याची सूचना किंवा समन्स दिलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नऊ नाण्यांची 18 नाणी झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता आणि याच कारणामुळे संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी 2022 साली साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.