शिर्डी संस्थानने कोरोना योद्ध्यांचे 40 टक्के पगार कापले

1242

देशातल्या श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानने कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढय़ातील सक्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात 40 टक्के कपात केली आहे. देवस्थानचे दोन्ही हॉस्पिटल्स, क्वारंटाइन सेंटर आणि कोरोना केअर सेंटरमध्ये हे कर्मचारी काम करत असून, यामध्ये नर्सिंग स्टाफसह सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. संस्थान प्रशासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.

शिर्डीच्या साईमंदिर प्रशासनाने साई संस्थानचे रुग्णालय आणि इतर ठिकाणी सेवा देणारे हे कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. यामध्ये शिर्डी परिसरातील सुशिक्षित तरुण आणि तरुणींचा समावेश आहे. वेतन आयोग घेणाऱया कायम कर्मचाऱयांच्या खांद्याला खांदा लावून हे कंत्राटी कर्मचारी काम करतात. मात्र, त्याचा मोबदला त्यांना दिला जात नाही. अनेक वर्षांच्या लढय़ानंतर संस्थानने जानेवारी महिन्यात कंत्राटी कर्मचाऱयांना 40 टक्के वेतनवाढ दिली होती. मात्र, ‘कोरोना’च्या संकटकाळात साईबाबा संस्थानने 40 टक्के वेतन कपात केल्याने हजारो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. संस्थानच्या इतर विभागातले कर्मचारी मंदिर बंद असल्याने घरी बसून आहेत. जे कर्मचारी घरी आहेत त्यांचा पगार कमी करणे ठीक आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही दिवसरात्र काम करूनही आमची पगार कपात का? असा सवाल आरोग्य कर्मचारी उपस्थित करत आहे.

साई संस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर आणि आता कोरोना केअर सेंटरसारख्या अत्यावश्यक ठिकाणी काम करणाऱया कर्मचाऱयांचे पगार कमी केल्याने संताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटकाळात साई संस्थानने राज्य सरकारला 51 कोटींची मदत केली आहे. कोरोना केअर सेंटर उभारले आहे. मात्र, त्यात काम करणाऱया कर्मचाऱयांचे पगार कापणे अन्यायकारक आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या