रामनवमी उत्‍सवात दोन लाख साईभक्‍तांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन, दान केले कोट्यवधी रुपये

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने बुधवार दिनांक 29 मार्च ते शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 याकालावधीत साजरा करण्‍यात आलेल्‍या श्री रामनवमी उत्‍सवात सुमारे 2 लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

जाधव म्‍हणाले, श्री रामनवमी उत्‍सव मोठया उत्‍साही वातावरणात पार पडला असून या उत्‍सवकाळात साईभक्‍तांकडून श्री साईबाबा संस्‍थानला विविध माध्‍यमातुन भरभरुन देणगी प्राप्‍त झाली आहे. यामध्‍ये दानपेटीतून 1 कोटी 81 लाख 82 हजार 136 रुपये, देणगी काउंटरव्‍दारे 76 लाख 18 हजार 143, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी, मनी ऑडर आदींव्‍दारे 1 कोटी 41 लाख 52 हजार 812 रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने 171.50 ग्रॅम (रुपये 8 लाख 64 हजार ७२३) व चांदी २७१३ ग्रॅम (रुपये ०१ लाख २१ हजार ८१३) देणगी प्राप्‍त झालेली आहे. अशाप्रकारे विविध मार्गाने एकुण *०४ कोटी ०९ लाख 39 हजार 627 रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.

तसेच या व्‍यतिरिक्‍त उत्‍सवकाळात सशुल्‍क व ऑनलाईन पासेस व्‍दारे एकुण 61 लाख 43 हजार 800 रुपये देणगी प्राप्‍त झाली. तसेच श्री साईप्रसादालयात उत्‍सवकाळात 1,85,413 साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर ३२५३० साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच 32,500 तीन नगाचे लाडु पाकीटे व 3,39.500 एक नगाचे लाडु पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे 42 लाख 08 हजार 400 रुपये प्राप्‍त झाले आहे. तर 1,16,000 मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.

तसेच श्री रामनवमी उत्‍सवकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे 43,424 साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात 5954 साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. अशी एकुण 49,378 साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असल्‍याचे जाधव यांनी सांगितले.