आंघोळ

>> शिरीष कणेकर

‘तुम्ही आंघोळ करता का?’ उत्तर ‘हो’ असेल तर पुढला प्रश्न. रोज करता का? पुन्हा उत्तर ‘हो’ असेल तर पुढला प्रश्न. साबू लावून करता का? आता ‘हो’ म्हणायचा कंटाळा आला असेल किंवा आपण ‘होयबा’ ठरतोय अशी भीती वाटत असेल किंवा राज्यातील सर्वोत्कृष्ट आंघोळपटू म्हणून आपली निवड निश्चित झाल्याचे समाधान असेल तर सरळ उठून आंघोळीला जा. जाताना टॉवेल व बदलायचे कपडे घेऊन जा, कपडे आत बदलायचे की बाहेर बदलायचे हा निर्णय पक्षनेत्याला (पक्षी – चाबूकधारी बायको) न विचारता स्वतःच्या अधिकारात तुम्ही घेऊ शकता. मात्र ओला टॉवेल तुम्ही गादीवर टाकलात तर आंघोळीनंतर तुमची लगेच धुलाई होऊ शकते. बाथरूममधला नळ गेलेला असला तरी फरक पडत नाही. कारण हजामत ही बिनपाण्यानेच होत असते. या बायकांना कसलाही कोर्स न करता (नवऱयाची) हजामत इतकी चांगली कशी करता येते? हळद, संगीत यांच्या बरोबरीनं हजामपट्टी हा खास कार्यक्रम वधूसाठी लग्नाआधी ठेवलेला असतो का?…

बालपणीची आंघोळ किती सुखाची असते! मुख्य म्हणजे ती आई घालत असते. टबमध्ये कोमट पाण्यात बसायचं. हातानं ‘थब थब’ करीत सर्वत्र पाणी उडवायचं. आईलाही भिजवून टाकायचं. साबू टबातल्या पाण्यात टाकून खुशाल विरघळू द्यायचा. मग टॉवेलात गुंडाळून आई गाठोडय़ासारखं उचलून नेणार. अंग कोरडं करून आई त्यावर मुबलक बेबी पावडर शिंपडणार. कानशिलापाशी तिट्टं लावणार. मग ‘अडगुलं-मडगुलं’ म्हणत मामानं दिलेलं झबलं चढविणार. बाटलीतलं दूध पालथ्या हातावर पिचकारी सोडून ते प्रमाणात गरम आहे की नाही ते चेक करणार (‘आमच्या बाळाचं तोंड भाजेल ना. वा रे वा!’ अशी आईची कॉमेंटरी पार्श्वभूमीवर चालू असताना बाळाचे डोके पेंगणार. मग बाळ गुरुगुट्ट झोपी जाणार.) आई कितीतरी वेळ झोपलेल्या बाळाचा मुखडा पाहत पाणावलेल्या डोळय़ांनी बसून राहणार. मग ती बाळाला देवाचा अंगारा लावणार. त्याच्या लोडाखाली उदीची पुडी ठेवणार. मला त्या आंघोळीच्या आठवणीदेखील नाहीत. आईच्या आहेत असं आपलं म्हणायचं. मला जन्माचं दुःख देऊन ती गेली. मी अंगारा लावत नाही, उदीबिदी जवळ बाळगत नाही…
आंघोळीचे नाना प्रकार आहेत. (आपल्याला बघता येत नसले तरी). माझा एक मित्र आंघोळ करताना तोंड धूत नाही. का तर म्हणे, दिवसभरात काही न काही निमित्तानं तोंड हे धुतलं जातच असतं; मग आंघोळीच्या वेळेला परत कशाला? ही कसली शिंची काटकसर? उद्या तोंडचं पाणी पळेल तेव्हा कळेल? मी त्याला एवढंच म्हटलं, ‘आंघोळ करताना पार्श्वभागाला पाणी लागू देतोस की नाही?’

काही माणसं आंघोळ करताना मोठमोठय़ानं गातात. बाथरूमच्या बाहेर असताना आपण गायक आहोत असे आभास त्यांना कधीही होत नसतात. बाथरूममध्ये गेल्या गेल्या त्यांना कंठ कसा फुटतो? कदाचित आपण आत असताना बायको येऊन लाफा मारू शकत नाही या गुदगुल्या करणाऱया आनंदातून त्यांच्यातला ‘नहाणीघर गंधर्व’ जागा होत असेल. मला नेहमी प्रश्न पडतो की महंमद रफी आंघोळ करताना गात असेल का? बहुधा नसावा. दिवसभर तेच करायचं आणि आंघोळ करतानाही तेच? त्यातून बाथरूममधल्या गाण्याचे पैसे थोडेच मिळणार आहेत? शारदासारखे गाणारे मात्र बाथरूममध्ये नक्कीच गात असणार. बेसूर गाण्याला इतका वाव कुठे मिळणार? शंकर सोडून दुसरा कुठला संगीतकार त्यांना स्टुडिओत माईकसमोर ‘आ’ वासू देणार? कोणी घरी गायला बोलावलं तर शारदा, कमल बारोट विचारत असतील – ‘तुमच्याकडे सुसज्ज बाथरूम आहे ना?’

काही महाभाग आवर्जून अट्टहासानं थंडगार पाण्यानं आंघोळ करतात. ते कोणाकडे पाहुणे म्हणून गेले की त्यांच्यात व यजमानात काहीसा असा प्रेमालाप होतो.

पाहुणे – मला आंघोळीला पाणी कढत…
यजमान – एकदम कढत-कढत, उकळतंच म्हणा ना. कितीदा आम्ही त्याच पाण्यात चहा करतो.
पाहुणे – नाही-नाही, मी म्हणत होतो कढत मुळीच चालत नाही. मला ऐन थंडीतही गार पाणी लागतं. मी पुण्याचा आहे.
यजमान – नो प्रॉब्लेम. मी साध्या पाण्यात बर्फाचे तुकडे घालून देतो.
पाहुणे – इतकं गार की कुत्राही शहारला पाहिजे.
यजमान – आमचा टॉमी शहारत नाही, तो चावतो. तुम्ही ट्राय करा.

आंघोळीचेही नानाविध प्रकार आहेत. नदीतली, नळाखाली, शॉवरखाली, बादलीत पाणी घेऊन. आंघोळीला बसण्याचेही प्रकार आहेत. उभं राहून, मोडय़ावर बसून, पाटावर बसून, जमिनीवर फतकल मारून, उकीडवं बसून. माझा एक मित्र (कुठून आणलेत मी हे नमुने? की त्यांनीच माझ्यासारखा नमुना शोधलाय?) निम्मी आंघोळ जमिनीवर बसून, निम्मी जमिनीवर लोळून करतो. बाथरूममध्ये जमिनीवर लोळतो? कोणीतरी कधीतरी त्याला बाथरूममध्ये लोळवले असावे व मग त्याला सवयच लागली असावी. मला लोळवायचं असेल तर बाथरूममध्येच हे तो त्याच्या हितशत्रूंना निक्षून सांगत असणार. ‘माझी विकेट काढायची तर ती क्रिकेटच्या मैदानावर’ असे विराट कोहली सांगत असेल (तुम्ही अनुष्का असाल तर गोष्ट वेगळी).

काही माणसांची आंघोळ म्हणजे कावळय़ाची आंघोळ असते. उगीच नावाला दोनचार शिंतोडे अंगावर उडविल्यासारखे करणार. याला ते आंघोळ का म्हणतात कळत नाही. याच्या उलट काही माणसं एवढा साबू अंगावर घालतात की कोणाला वाटावं हे देह नाही तर आपली पापं धुतायत. धुवा साल्यांनो, साबण कंपन्या यांच्या आंघोळी ‘स्पॉन्सर’ करीत असणार.
अलीकडे माझ्या दिवसातल्या आंघोळींची संख्या वाढल्येय. एका आंघोळीनं भागत नाही इतक्या लोकांच्या नावानं मला आंघोळ करायची असते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या