सोमवारपासून शिरोळ तालुक्यात 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन

शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तेव्हा संसर्गाची साखळी तोडायची असेल तर काय करावे लागेल याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तिन्ही शहरांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, तालुक्यातील सरपंच, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाकडील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

जवळपास दोन तास सुरू असलेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये अनेकांनी सहभाग घेत आपापल्या परिसरातील परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत सूचना केल्या व आपली मते मांडली, बहुतांश जणांनी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी तरच संसर्ग रोखता येईल असा आग्रह धरला, सहभागी अधिकारी यांच्याकडून सुद्धा याच प्रकारची भूमिका मांडली गेली. संबंधितांकडून आलेल्या सूचना व एकूण परिस्थितीचा आढावा पाहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे सांगत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात सोमवार दिनांक 10 मेपासून दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

हा निर्णय सर्वांच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर एकमताने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. दहा दिवसाच्या या काळात सकाळी सात ते साडे आठ वाजेपर्यंत केवळ दूध विक्री व किराणा विक्री सुरू राहील असे सांगताना भाजीपाला फिरुन विकण्यास या काळात मुभा राहील असे सांगितले. याखेरीज इतर सर्व प्रकारचे व्यापार उद्योग व व्यवसाय बंद राहतील, असेही सांगितले. दरम्यान येणाऱ्या रमजान ईद या दिवशी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता केवळ घरी नमाज पढण्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत लॉकडाऊनमध्ये शिथीलता राहील आणि दुपारनंतर नियमाप्रमाणे लॉकडाऊन निरंतर राहील, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

मुंबईसारख्या शहरात लॉकडाऊन प्रभावीपणे राबविल्यामुळे तेथील रुग्ण संख्या झपाट्याने खाली येत आहे असे सांगताना शिरोळ तालुक्यातील जनतेने या कामी सहकार्य करावे, असे आवाहन ही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केले. कोरोनाच्या पहिल्या लाटे वेळी गावा गावांमधील ग्राम समित्यांनी अतिशय चांगले काम केले होते, आजही ते करत आहेत. मात्र, यावेळी बाधीत रुग्णांच्या घरातील नातेवाईक कोणतीही काळजी न घेता घराबाहेर पडत असल्याने संसर्ग वाढत असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्राम समितीचे सदस्य, महसूल व आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पहात नियम मोडणाऱ्यांवर हवेतर कारवाई करावी असेही सांगितले.

यावेळी तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि आरोग्य विभाग, महसूल विभागाकडील अडचणींबाबत राज्यमंत्री यड्रावकर यांनी आढावा घेत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये जवळपास 81 जणांनी सहभाग घेतला आणि आपल्या भूमिका मांडल्या मते व्यक्त केली. प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या