शिरूर – मुंबईवरून आलेल्या बाप-लेकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

936

राऊतवाडी, शिक्रापूर (तालुका शिरूर) येथील मुंबईवरून आलेल्या दोघा बाप-लेकाचा कोरोना संसर्गाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिरूर तालुक्यात एका दिवसात मांडवगण फराटा एक व शिक्रापूर दोन अशी तीन रुग्ण आढळल्याने शिरूर तालुका हादरला आहे.

घाटकोपर मुंबई येथे राहणारे एक कुटुंब राऊतवाडी शिक्रापूर येथे आले होते. या इसमाच्या कुटुंबातील त्याचे वडील (72) यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेतले. तेथे संशय वाटल्याने 24 मे रोजी या वृद्ध नागरिकाला ससून रुग्णालयात पाठवले होते. तिथून त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या मुलाला देखील त्रास जाणवू लागल्याने त्याने स्वतः रुग्णालयात दाखल होऊन तपासणी केली असता त्याचा व त्याच्या वडिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे. या दोघांच्या संपर्कात आलेल्या पाच जणाना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच राऊतवाडीचा परिसर सील करण्यात आला आहे.

मुंबई-पुणे या हॉटस्पॉट भागातून येणाऱ्या नागरिकांमुळे शिरूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. तालुक्यात सनसवाडी, शिक्रापूर, विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे, कारेगाव, कवठे यमाई, शिवतक्रार माळुंगे, म्हसे बुद्रुक या ठिकाणी आतापर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला माहिती द्यावी – बी. बी. गोरे
शिक्रापूर ता. शिरूर गावामध्ये पुणे, मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांची माहिती ग्रामस्थांनी वेळीच ग्रामपंचायत कार्यालयात देणे गरजेचे असून त्यामुळे योग्य खबरदारी घेत पुढील उपाययोजना राबविता येऊ शकतात असे ग्रामविकास अधिकारी बी. गोरे यांनी सांगितले.

नागरिकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे – सदाशिव शेलार
शिक्रापूर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असून विनाकारण बाहेर फिरू नये तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या नातेवाईकांची व्यवस्था विलगिकरण कक्षात करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या