कवठे येमाईच्या हिलाळ मळ्यात बिबट्याची दहशत, शेतकरी धास्तावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बारमाही बागायती क्षेत्र असलेल्या कवठे येमाई गाव शिवारात खास करून हिलाळमळ्यात मागील आठवड्यापासून बिबट्याची पुन्हा दहशत पसरली आहे. रात्री आठच्या दरम्यान शेतातून घरी परतणाऱ्या चार शेतकऱ्यांना मोठा बिबट्या रस्त्यातील गाडेखडक ओढ्यातील पुलावरून डरकाळी फोडत चालल्याचे बॅटऱ्यांच्या उजेडात दिसले. बिबट्यांच्या सातत्यपूर्ण दर्शनाने परिसरात शेतावर वस्ती करून राहणारे नागरिक,शेतकरी पूर्ण धास्तावले आहेत.

शेतात काम करताना जीव मुठीत धरून काम करीत असले तरी अनेकदा दिवसासुद्धा बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. या परिसरात मानवी वस्ती ,जनावरे यांचे वास्तव्य असल्याने बिबट्याची दहशत पहाता वनविभागाने तत्परतेने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी विनायक शिंदे, दत्तू शिंदे, बोरकर, देवराम शिंदे व शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे याच शेतकऱ्यांनी हा बिबट्या प्रत्यक्ष पहिला असल्याचे भाऊसाहेब साळवे यांनी सांगितले.

तर बिबट्याची दहशत पाहता परिसरातील नागरिक चांगलेच घाबरले असून वारंवार पाळीव प्राण्यांवर होत असलेले हल्ले पाहता बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी वन विभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.