मुंबई पोलीस दलाच्या वतीने सध्या मरिन ड्राईव्ह येथील विद्यापीठ मैदानात भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु या भरतीत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार कळताच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी जाऊन समस्या जाणून घेतल्या.
भरपावसाळ्यात सध्या सर्वत्र पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहेत. मुंबईत घाटकोपर आणि मरिन ड्राईव्ह येथील मैदानांवर भरती प्रक्रिया सुरू आहेत. मैदानात गेल्यावर उमेदवारांना कुठलीही समस्या येऊ नये यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. परंतु मैदानाबाहेर येऊन थांबणाऱ्या उमेदवारांसाठी कुठलीच सुविधा करण्यात आलेली नाही. पिण्याचे पाणी, फिरते शौचालय या प्राथमिक सुविधा नसून सहभागी होण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना पावसापासून बचाव करण्यासाठी मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत आहे. शिवाय त्या परिसरात खाद्यपदार्थ मिळतील अशी कुठली सुविधा नाही.
सकाळी मैदानात जायचे म्हणून रात्रीच मैदानाबाहेर येणाऱ्या उमेदवारांचे अक्षरशः हाल होत आहेत. पाऊस पडत असल्याने उमेदवार व सोबत येणाऱ्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत माहिती मिळताच शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख जयवंत नाईक, युवासेना अधिकारी विकास आडुळकर, रौनक बेराई व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन उमेदवारांकडून त्यांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. उद्यापासून पिण्याचे पाणी, फिरते शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली जात असल्याचे संतोष शिंदे यांनी सांगितले.