घाटकोपरमधील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले सुरूच असल्याने डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सुरक्षेचे तीनतेरा वाजले असून डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिव आरोग्य सेनेने केली आहे.
घाटकोपर पूर्वेकडील मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने राजावाडी प्रशासनाकडे केली आहे. या गंभीर प्रकाराचे महत्त्व लक्षात घेऊन वॉर्ड ऑफिसर, डीएमसी आदी मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यास सांगावे, अशी मागणी शिव आरोग्य सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी लवकरात लवकर सुरक्षारक्षक वाढविले जातील, असे पालिका उपायुक्तांनी खासदार संजय पाटील यांच्या समोर आश्वासन दिले. यावेळी शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत आडे, महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या सूचनेनुसार ईशान्य मुंबई विभागप्रमुख/नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सह समन्वयक प्रकाश वाणी, विभाग संघटक सचिन भांगे, पैलास गोसावी, चंद्रकांत हळदणकर उपस्थित होते. यावेळी खासदार संजय पाटील यांच्या वतीने परिमंडळ-6 चे उपायुक्त संतोषकुमार धोंडे व सहाय्यक आयुक्त गजानन बल्लाळे यांच्या उपस्थितीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.