पुण्याचे क्रीडा संघटक पंढरीनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार; शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा

350

महाराष्ट्रातील मानाचा अन् प्रतिष्ठेचा म्हणून ओळखल्या जाणाऱया शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवारी मुंबईत करण्यात आली. पुण्यातील क्रीडा संघटक पंढरीनाथ तुकाराम पठारे यांची ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याप्रसंगी जीवनगौरव यांच्यासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, साहसी व दिव्यांग या प्रकारांत एकूण 63 जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी पाच जणांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारही जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार यादी जाहीर करण्यात आली. आता येत्या 22 फेब्रुवारीला मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.

यंदा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीतून कार्यकर्ते, संघटकांसाठी पुरस्कार देण्यात आलेला नाही. यावर सुनील केदार यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य क्रीडा पुरस्कार हा आपल्या राज्यातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. यासाठी फक्त खेळाडूंच्याच नावाचा विचार करायला हवा. कार्यकर्ते, संघटकांसाठी आमचा वेगळा विचार सुरू आहे.

पुरस्कार विजेते मुंबईकर

 • हर्षद हातणकर (खो-खो)
 • रिशांक देवाडिगा (कबड्डी)
 • सोनाली शिंगटे (कबड्डी)
 • प्रियांका गौडा (वुशू)
 • अवंतिका चव्हाण (जलतरण)
 • मधुरा वायकर (सायकलिंग)
 • गणेश शिंदे (मल्लखांब)
 • नीलेश गराटे (पॉवरलिफ्टिंग)
 • आदिती दांडेकर (जिम्नॅस्टिक्स)
 • वेदांगी तुळजापूरकर (नेमबाजी)
 • करुणा वाघमारे (शरीरसौष्ठव)
 • सोनाली गीते (पॉवरलिफ्टिंग)
 • प्रभात कोळी (खाडी पोहणे)
 • पार्थ हेंद्रे (जलतरण)
 • जयदीपकुमार सिंह (ज्युदो)
 • श्वेता शेरवेगार (यॉचिंग)
 • विघ्नेश देवळेकर (बॅडमिंटनपटू)

शाळांसोबतच कॉलेजमध्येही खेळांवर लक्ष देणार

मुंबईसह महाराष्ट्रात शालेय स्तरावर चांगल्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात, पण कॉलेज स्तरावर मात्र क्रीडा स्पर्धांचा अभाव दिसून येतो. मुंबईसह महाराष्ट्रातील युवकांना कॉलेज स्तरावरही अव्वल दर्जाच्या स्पर्धांमध्ये खेळता यावे यासाठी पाऊल उचलण्यात येईल, असे सुनील केदार यावेळी म्हणाले.

‘खेलो इंडिया’ पदक विजेत्यांचा गौरव

शनिवारी मुंबईत पार पडणाऱया या सोहळ्यात गुवाहाटी येथे रंगलेल्या ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांनाही गौरविण्यात येणार आहे. यावेळी 306 पदकविजेत्यांना 3.25 कोटी रुपये बक्षिसांच्या रूपात देण्यात येणार आहेत.

त्यावर काम करणार

क्रीडा मार्गदर्शक म्हणून पुरस्कार देताना यापुढे दक्षता बाळगळण्यात येणार आहे. एखादा व्यक्ती महाराष्ट्रातील विविध जिह्यांतील वेगवेगळ्या खेळांमधील मार्गदर्शक कसा काय असू शकतो, असा सवाल केला असता सुनील केदार म्हणाले, यापुढे या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे. त्यावर काम करण्यात येईल.

आता खेळाडूंना सेवेत असताना खेळांवरच ध्यान देता येईल

एखादा खेळाडू सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर त्याच्यावरील जबाबदारीमुळे त्याला खेळांवर पाणी सोडावे लागते. त्यामुळे महाराष्ट्राचे खेळाडू हरयाणा, रेल्वे यांच्या मागे पडताना दिसताहेत. पण यापुढे असे चित्र दिसणार नाही. सुनील केदार यावेळी म्हणाले, या प्रकरणाच्या फाइलवर माझे लक्ष आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या