किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन उत्साहात

हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत आज किल्ले प्रतापगडावर 363वा शिवप्रतापदिन मोठय़ा उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा झाला. ढोल-ताशांचा गजर, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, फटाक्यांच्या आतषबाजीत शिवप्रतापदिन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यंदाच्या शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला प्रशासनाने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यंदा प्रथमच गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संपूर्ण गडाला फुलांनी सजविण्यात आले होते. कुंभरोशीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भगवे ध्वज लावण्यात आले होते. शिवप्रतापदिनाच्या पूर्वसंध्येला गडावर लेझर शो आयोजित करण्यात आला होता. यातून अफजल खान वधाची कहाणी दाखविण्यात आली.

आज सकाळी भवानी माता मंदिरात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते देवीची पूजा व अभिषेक करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील व गिरीश दापकेकर उपस्थित होते. यानंतर भवानी माता मंदिरात आरती केल्यानंतर मंदिराच्या प्रांगणातील चौथऱयावर कुंभरोशीच्या सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावण्यात आला. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शिवपालखीची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान, प्रतापगड संवर्धनाचा 100 कोटींचा आराखडा तयार केला असून, त्यातील पहिल्या टप्प्याच्या कामांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.