आज प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा

स्वराज्यावर चालून आलेल्या बलाढय़ अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर काढला. त्या शिवप्रतापाचे स्मरण म्हणून सालाबादप्रमाणे गुरुवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे. या सोहळय़ाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या अलौकिक सहसाच्या-पराक्रमाच्या घटनेला गुरुवारी 366 वर्षे पूर्ण होत आहेत. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी या तिथीला 10 नोव्हेंबर 1659 रोजी हा अलौकिक शिवप्रताप घडला होता. या महान युद्धाचे स्मरण म्हणून दरवर्षी प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठय़ा उत्साहात साजरा होतो. भवानी माता मंदिर परिसर, शिवप्रतिमा मिरवणूक आणि शिवपुतळा जलाभिषेकाच्या विधीमुळे संपूर्ण महाबळेश्वर शिवमय होणार आहे. शिवप्रतापदिनाची सुरुवात भवानी मातेस अभिषेक आणि आरतीने होणार आहे.