बजरंग बली की जय… शिवसैनिकांचा हिसका, महापालिकेचे बुलडोझर माघारी फिरले; भाजपच्या बेगडी हिंदुत्वाची पुन्हा झाली पोलखोल

प्रभादेवी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुप्रसिद्ध मारुती मंदिरावर पालिकेला हाताशी धरून हातोडा मारण्याचे इंडिया बुल्स स्काय सोसायटीचे कारस्थान आज शिवसैनिकांच्या हिसक्याने हाणून पाडले. मंदिरालगतची भिंत पाडण्यास जेसीबी सरसावताच शेकडोच्या संख्येने दाखल झालेल्या शिवसैनिकांनी ‘बजरंग बली की जय’चा नारा देत कारवाईला विरोध केल्याने महापालिकेचे बुलडोझर माघारी फिरले. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्याने भाजपच्या बेगडी हिंदुत्वाची पोलखोल झाली.

प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय टॉवर सोसायटीजवळ हे पुरातन मंदिर आहे. या मंदिर परिसरात इंडिया बुल्स स्काय ही आलीशान रहिवासी इमारत आहे. या परिसराचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र या मंदिराची जागा आपल्या मालकीची असल्याचे इंडिया बुल्स सोसायटीकडून सांगितले जात असून आता पालिकेला हाताशी धरून मंदिर हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप भाविकांमधून करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज दुपारी मंदिरालगतची भिंत जेसीबीने पाडण्यास सुरुवात करण्यात आली. ही कारवाई सुरू झाल्याचे कळताच शिवसैनिक, भाविक आणि स्थानिकांनी धाव घेत कारवाईला विरोध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून कारवाई रोखण्यात आली. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस अरुण तोरसकर, उपविभागप्रमुख शैलेश पाटील, उप शाखा संघटक शैलजा पवार, रूपेश जांभळे, दिनेश घनकुटकर आदी उपस्थित होते.

सोसायटीची भूमिका संशयास्पद

हनुमान मंदिराच्या बाजूलाच काही वर्षांपूर्वी बांधलेले जैन मंदिरही आहे. आता याच ठिकाणी नवे जैन मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र, हे मंदिर कुठे बांधले जाणार आहे, ती जागा कोणती, याचा उल्लेख इंडिया बुल्स स्काय सोसायटीने पालिकेकडे केलेल्या अर्जात केलेला नाही. त्यामुळे सोसायटीच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

…म्हणे मंदिराचा जीर्णेद्धार करणार!

जैन मंदिर बांधताना हनुमान मंदिराचा जीर्णेद्धार करून देऊ अशी ‘ऑफर’ सोसायटीने मंदिर प्रशासनाला दिली आहे. मात्र नक्की कसे आणि कोणते काम होणार याबद्दल माहिती देण्यात आली नसल्याने जैन मंदिराच्या नावाखाली हनुमान मंदिरावर हातोडा मारण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना, भाविक आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मंदिर हटवण्याचा डाव?

मारुती मंदिर परिसरामध्ये नव्या जैन मंदिराच्या भूमिपूजनासाठी भिंत हटवण्यात येत असून 4 जूनला हे भूमिपूजन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले मारुती मंदिर हटवण्याचा डाव असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. यासाठी पालिकेच्या जी-दक्षिण वॉर्डकडून परवानगीसाठी अर्जही करण्यात आला आहे. मात्र वॉर्डकडून परवानगी मिळण्याआधीच सोसायटीने मुजोरपणे पालिकेला हाताशी धरून भिंत पाडण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त होत आहे.