महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक आणली. आपण जेवढे उद्योग आणले ते सर्व मिंधे सरकारने गुजरातला पाठविले. आज येथील तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. मला गुजरातचा राग नाही. परंतु माझ्या महाराष्ट्राला हक्काचे मिळालेच पाहिजे त्यासाठी मी नडणार म्हणजे नडणारच, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिला. यावेळी त्यांनी मिंधे सरकारच्या अनेक योजनांचाही खरपूस समाचार घेतला.
छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र स्वाभिमान सभेत आदित्य बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 400 पारची भाषा करणाऱ्या भाजपला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलायचे होते. एकाच व्यक्तीची ‘मन की बात’ चालत नसते, येथे लोकांची ‘मन की बात’च चालते आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘400 पार’चा दावा कसा खोटा ठरला आणि ते कसेबसे 240 गाठल्यावर लक्षात आले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पुढची निवडणूक ही आपल्या स्वाभिमानाची आह़े आपल्याला विकत घेण्याचा, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मिंधे-भाजपा करतील आणि राजकीय पोळ्या भाजून घेतील. पण त्यांना नामोहरम करण्यासाठी आपण निवडणूक लढवून त्यांना हरवणारच, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. या सभेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते व विधान सभेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख ज्योती ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्राला काय मिळाले?
जे गद्दारी करून गुवाहाटीला पळाले, त्यापैकी कुणाला 72 व्या मजल्यावर घर मिळाले असेल, डिफेंडर गाडय़ा मिळाल्या असतील, कुणाला टोलनाके मिळाले असतील, मुख्यमंत्र्याकडे जे मागितले ते मिळते; परंतु महाराष्ट्राला दोन वर्षांत जे पाहिजे ते मिळाले का? जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती झाली का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
महिलांना शिव्या देणारे मंत्री तुमचे भाऊ होऊ शकतात का?
आदित्य ठाकरे यांनी यावेळी मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावरही निशाणा साधला. एका आमदाराने सुप्रिया सुळे यांना शिव्या दिल्या होत्या. त्याला पालकमंत्री बनवले आहे. असे मंत्री तुमचे भाऊ होऊ शकतात का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
खरंच जर्मनीत नोकरी देणार?
मर्सिडीज पंपनीवर धाड होती की ते हप्त्यासाठी होते याचे उत्तर मिंधे सरकारने द्यावे असा टोला लगावून येथील पंपन्या बंद करणारे मिंधे सरकार जर्मनीमध्ये एक लाख बेरोजगारांना नोकरी देण्याची भाषा करीत आहे. राज्यातील परभणीत बेरोजगारांना नोकरी नाही आणि हे जर्मनीत खरंच नोकरी देणार आहेत का? त्यासाठी विमाने भरून बेरोजगार जर्मनीत पाठवणार आहेत का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.