कल्याण बाजार समितीवर युतीचे वर्चस्व, शिवसेनेचे कपिल थळे बिनविरोध सभापती

shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी, कल्याण

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकला. आज झालेल्या पदाधिकारी निवडीत शिवसेनेचे कपिल थळे यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतीपदी भाजपचे प्रकाश भोईर यांची निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांनी काम पाहिले. बाजार समितीत पूर्ण बहुमत असल्याने शिवसेनेचा सभापती होणार आहे. यामुळे निवडीची केवळ औपचारिकता आहे. 17 मार्चला बाजार समितीची निवडणूक पार पडली, तर 25 मार्च रोजी मतमोजणी झाली. बाजार समिती कायद्याप्रमाणे एक महिन्यात सभापती निवड होणे बंधनकारक होते. यामुळे आज निवडीचा कार्यक्रम झाला. बाजार समितीत 18 पैकी सर्वाधिक 10 सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत.

राष्ट्रवादीचे 4, भाजपचे 2 तर अपक्ष 2 सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना-भाजप युतीमुळे विरोधकांनी सभापती- उपसभापती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचे कपिल थळे यांची सभापती तर उपसभापतीपदी भाजपचे प्रकाश भोईर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी नूतन पदाधिकाऱयांचे अभिनंदन केले.