हिंदुत्व कशासाठी? मंदिरासाठी की सत्तेसाठी? मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहाबानो प्रकरणात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी न्यायालयाचा निकाल बदलला. आता अॅट्रॉसिटी प्रकरणातही निकाल बदलण्यात आला. मग अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी हाच निकष का लावला जात नाही? गेली कित्येक वर्षे ऐकतोय, मंदिर वहीं बनायेंगे! अरे, कधी होणार? हिंदुत्वाच्या धाग्याने आम्ही तुम्ही एकत्र बांधले गेलो. हिंदुत्वाच्या शिडीवरूनच तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर गेलात. सत्ता मिळाली, चार वर्षे झाली. कुठे गेले तुमचे हिंदुत्व? हिंदुत्व नेमके कशासाठी? मंदिरासाठी की सत्तेसाठी? असा खडा सवाल आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हाच जाब विचारण्यासाठी 25 नोव्हेंबरला अयोध्येत जात असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

संभाजीनगर, बीड व लातूर येथे आज शिवसेना गटप्रमुखांचे दणदणीत मेळावे झाले. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारची पिसेच काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करतात. त्यांच्या मनातले ऐकण्यासाठी लोक जमतात. पंतप्रधान आहेत, कशाला खोटे बोलतील, असा भाबडा समज या लोकांचा असतो. पण खोटे बोलण्याची, थापा मारण्याचीही काही मर्यादा असते? अशाच एका कार्यक्रमात शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट झाल्याची लोणकढी यांनी मारली. ज्या महिलेची साक्ष काढली, तिच्याकडून पत्रकारांनी माहिती घेतली अन् हे उघडे पडले. असा यांचा कारभार!

आटा महाग, डाटा फुकट!

सध्या आटा महाग, डाटा फुकट अशी परिस्थिती असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. बीड येथे एका शेतकऱयाची भेट घेतली. त्याच्या शेतातील कापूस उद्ध्वस्त झाला आहे. एवढेच काय कडुलिंबाला कीड लागली आहे. काँग्रेसच्या काळात नव्हते असे प्रकार. जे 60 वर्षांत झाले नाही ते यांच्या चार वर्षांच्या काळात घडले. सरकार म्हणून काय करताय? कोणती जबाबदारी पार पाडलीत? असा घणाघाती सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

दुष्काळसदृश परिस्थिती, आभारसदृश धन्यवाद

महाराष्ट्रात दुष्काळाने हातपाय पसरले आहेत. परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने 180 गावांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले, त्यामुळे त्यांना आभारसदृश धन्यवाद! असा शालजोडीतला उद्धव ठाकरे यांनी हाणला. केंद्राचे पथक येणार, पाहणी करणार, त्यानंतर दुष्काळ जाहीर होणार. त्यामुळे जेव्हा पूर्ण दुष्काळ जाहीर कराल तेव्हा आभार मानेन, असेही ते म्हणाले.

दैवत बदलणारी अवलाद तुमची

निवडणूक आली म्हणून शिवसेनेला राममंदिराची आठवण झाली असे कुणीतरी म्हणाले. आमचे दैवत एकच, शिवसेनाप्रमुख! यांनी आतापर्यंत किती दैवते बदलली? दैवत बदलणारी अवलाद तुमची! तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचा पाठ शिकवू नये, तो आमच्या रक्तात आहे, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भ़ुजबळ यांना सुनावले. आणि तुमच्यापेक्षा रामाची आठवण बरी, असे ते म्हणाले. जामिनावर सुटले, पण जमिनीवर आले नाही, असा भीमटोलाही उद्धव ठाकरे यांनी भुजबळांना नाव न घेता लगावला.

तुमचे बारा वाजलेत, तुमचा पक्ष सांभाळा

आम्ही अयोध्येत जाणार म्हटल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात मुरडा आला. अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही! बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते… आम्ही येतो, आम्ही येतो! अडगळीत गेलेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, तुमचे बारा वाजलेत, तुमचा मोडकळीला आलेला पक्ष अगोदर सांभाळा, असे खडे बोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सुनावले. दुष्काळ आहे. महाराष्ट्रातली धरणे, तलाव कोरडे पडलेत. अजित पवारांना फिरकू देऊ नका! असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच!

पिचलेल्या महाराष्ट्राला सुखाचे दोन क्षण देण्यासाठी मला शिवसेनेची सत्ता आणायची आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच! असा वज्रनिर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवताच उपस्थित हजारो शिवसैनिकांनी त्यांना टाळय़ांच्या गजरात साद दिली. मला महाराष्ट्राला कोणतेही खोटे स्वप्न दाखवायचे नाही. मला सत्तेची, खुर्चीची हाव नाही. जे काही करायचे आहे ते तुमच्यासाठी, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

घाबरू नका शिवसैनिक तुमच्या पाठीशी

‘‘दुष्काळ अक्राळविक्राळ रूप धारण करतोय. सरकार काय करतेय मला माहिती नाही. पण अशा या बिकट परिस्थितीत माझा शिवसैनिक शेतकऱयांच्या खांद्याशी खांदा लावून उभा राहील. शेतकऱयांनो, दुष्काळाला घाबरू नका, अर्ध्या रात्री फक्त आवाज द्या, शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे!!’’ असा दिलासा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. चारा, पाणी, अन्नधान्य आणि त्याबरोबरच दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी हिंमत घेऊन शेतकऱयांबरोबर उभे राहा, असे आदेशच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

राममंदिरही जुमला आहे का?

निवडणूक जिंकण्यासाठी जुमलेबाजी करावी लागते हे खरे असेल तर राममंदिराचा मुद्दाही जुमलेबाजीच आहे का? याचे उत्तर यांना द्यावेच लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. कित्येक वर्षे झाली ऐकतोय, निवडणुका आल्या की राममंदिर, कलम 370 आणि समान नागरी कायद्याचे ढोल वाजतात. दोन खासदारांवरून बहुमतावर गेले. राम मंदिर कुठे आहे हे आम्हाला कुठे माहिती होते? तुम्हीच तर वारंवार सांगितले, ‘मंदिर वहीं बनायेंगे’चा नारा दिला होतात ना? कित्येक शिवसैनिक गेले होते अयोध्येला. मुलायम सरकारने कारसेवकांना मारले. गोळय़ा घातल्या. ज्यांच्या उरात थोडी धुगधुगी होती त्यांच्या गळय़ात दगड बांधून शरयूत फेकले. शरयू कारसेवकांच्या रक्ताने लालेलाल झाली. रामनामाचा जप करीत सत्ता मिळवलीत आणि खुर्ची मिळाली की रामाला विसरले. हिंदुत्व हाच आमचा धागा होता. याच विचारावर आम्ही एकत्र आलो. हिंदुत्व हे मंदिरासाठी की सत्तेसाठी हाच जाब मोदींना विचारण्यासाठी 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 2019 मध्ये मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकित शरद पवार यांनी केले आहे. मोदी पंतप्रधान होणार नसतील तर मंदिर कोण बांधणार? त्यामुळे आता नाही तर मग केव्हा मंदिर बांधणार? एकदाचे खरे काय ते सांगून टाका, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

गटप्रमुख हाच निवडणुकीचा आत्मा

गटप्रमुखांच्या मेहनतीवरच शिवसेनेने आतापर्यंत निवडणुकीचे मैदान मारले आहे. गटप्रमुख हा निवडणूक प्रक्रियेचा आत्मा आहे. येणारा काळ अतिशय खडतर आहे. गटप्रमुखांनी मतदार याद्या, मतदारांशी आतापासूनच संपर्क साधावा, असे आदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. भगवा फडकवण्याचे बघितलेले स्वप्न तुमच्या जोरावरच प्रत्यक्षात उतरणार आहे. तेव्हा घराघरात जा. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घ्या. त्यांच्या अडचणी समजून घ्या. आमच्यापर्यंत पोहोचवा. निवडणुकीचे धोरण ठरवताना गटप्रमुखांचे मतच महत्त्वाचे आहे. हे शिवसैनिकांचे जाळेच सर्वसामान्यांच्या आशेचे मोठे केंद्र आहे. खरे तर हा मेळावा हॉलमध्ये घ्यायचा होता. गुप्त बोलायचे होते. पण आपल्याकडे भिंती नाहीत. पण छप्पर आहे. गोरगरीबांच्या डोक्यावर छप्पर देण्याचे काम करतो म्हणूनच आज 52 वर्षांनंतरही शिवसेना तरुण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.