जेटच्या कामगारांची रोजीरोटी टिकलीच पाहिजे! मुख्यालयावर धडकला शिवसेनेचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jet-airways-union

सामना प्रतिनिधी । मुंबई

जेट एअरवेजच्या कामगारांची रोजीरोटी टिकलीच पाहिजे, थकीत वेतन मिळालेच पाहिजे, अशा जोरदार मागण्या करत शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱयांचा मोर्चा आज अंधेरी पूर्व येथील जेटच्या मुख्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये जेटचे पाच हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

जेट एअरवेज बंद झाल्याने हजारो कर्मचाऱयांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचाऱयांच्या नोकऱया टिकल्या पाहिजेत या मागणीसाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आज जेटच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यात जेटच्या कर्मचाऱयांसह विमानतळ परिसरातील अन्य एअरवेजचे कर्मचारी तसेच भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

याप्रसंगी सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे उपाध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस संतोष चाळके, चिटणीस संजय कदम, प्रकाश नाईक, गोविंद राणे, दिलीप पणीकर, मनोज धुमाळ यांच्यासह जेट एअरवेजच्या कमिटी सदस्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने व्यवस्थापनाशी चर्चा केली. जेट एअरवेज टिकलीच पाहिजे, केबिन क्रू, इंजिनीयर, ग्राऊंड स्टाफ, लोडिंग आणि अनलोडिंग कर्मचारी यांची रोजीरोटी टिकली पाहिजे आणि त्यांचे थकीत वेतन मिळाले पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

व्यवस्थापनाच्या वतीने सीईओ विनय दुबे यांनी भारतीय कामगार सेनेच्या मागण्या मान्य असल्याचे सांगत त्याच दिशेने आपले जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक, नागरी उड्डाण मंत्री आणि बँकांकडून जेटसाठी आगाऊ रक्कम मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, विजय धामणे, अरुण तोरसकर, जीवन कामत, विजय वालावलकर, प्रमोद गावकर, सहचिटणीस सुर्यकांत पाटील, जगदीश निकम, शरद आजगावकर, विजय तावडे, मिलिंद तावडे, विजय शिर्के, राजा ठाणगे, संजू राऊत, श्रेयस सावंत, दिलीप भट, सदस्य नीलेश ठाणगे, विशाल पारकर, शरद परब, नितीन गोवेकर, योगेश आवळे, नितीन गायकवाड, संजय गुणके, प्रशांत कानडे, राजन जाधव, तोडणकर, गावडे, बडदाडे उपस्थित होते.