‘ठरल्याप्रमाणे करा, हाच प्रस्ताव’ – संजय राऊत

2390
sanjay-raut-press

‘कोणताही प्रस्ताव येणार नाही की जाणार नाही. प्रस्ताव जो पहिल्यापासून ठरला होता. ठरल्याप्रमाणे करा, जे निश्चित झालं होतं, ज्या गोष्टींवर सहमती झाली होती तेच तुम्ही पुढे घेऊन चला हाच प्रस्ताव आहे’, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले.

महाराष्ट्रात इतरही अनेक प्रश्न आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दुष्काळग्रस्त भागांमध्ये फिरत आहेत. शेतकऱ्यांना आधार देत आहेत. अनेक प्रश्न या राज्यात आवासून उभे आहेत. शेतकरी आणि कष्टकरी हे शिवसेनेकडे आशेने पाहात आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जिथे जिथे शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला जात आहे तिथून फक्त एकच आवाज येतो आहे साहेब काही झाले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनवा तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्रीपदावर आधीच सहमती झाली होती. कितीवेळा सहमती होणार. जी सहमती झाली होती त्यानुसारच युती झाली. त्यावरच आम्ही निवडणुका लढल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करतो आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, याला आम्ही जबाबदार नाही. जर महाराष्ट्रात कोणत्याही कारणाशिवाय राष्ट्रपती राजवट लादण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर हा महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा सगळ्यात मोठा अपमान असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासोबत अन्याय होईल आणि अधर्माचा विजय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संजय राऊत यांनी सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या