सांगलीतील पूरग्रस्त कुटुंबाला 20 हजारांची मदत करा; शिवसेनेची मागणी

कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक भागांत पाणी घुसले. त्यामुळे गेल्या 11 दिवसांपासून पाचशेहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. शासनाने पंचनाम्याचे नाटक करत न बसता तत्काळ या कुटुंबांना प्रत्येकी वीस हजार रुपयांची मदत करावी व नुकसानग्रस्त शेतकऱयांना एकरी 50 हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी केली.

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 40 फुटांवर गेल्याने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, आरवाडे प्लॉट, पटवर्धन पार्क, गोवर्धन प्लॉट, साईनाथनगर, मगरमच्छ कॉलनी आदी परिसरातील दोन हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या अकरा दिवसांपासून पूरग्रस्त स्थलांतरित होत आहेत. हे नागरिक गरीब कुटुंबातील आहेत. रोजंदारी करून पोट भरतात. त्यामुळे शासनाने सर्वेक्षणाचे नाटक करत बसू नये. तातडीने स्थलांतरित असलेल्या कुटुंबाला मदत करावी तसेच नदीकाठच्या धामणी, हरिपूर, सांगलीवाडी, कसबे डिग्रज आदी गावांतील शेतकऱयांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱयांना एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी दिगंबर जाधव यांनी केली.

गावभाग, पेठभाग यांसह उपनगरांत पुराचे पाणी गेल्यानंतर या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे चोऱया वाढतात. साप, विंचू डसण्याचे प्रमाणदेखील वाढते. महापूर हा 2005 पासून येत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने या परिसरातील ट्रान्स्फॉर्मरची उंची वाढवावी. यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी द्यावा, अशी मागणी जाधव यांनी केली. पाटबंधारे विभागाने केवळ निसर्गावर अवलंबून राहू नये, पूर कसा ओसरेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन दिगंबर जाधव यांनी केले.