>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात शिवसेनेचाच ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बोलबाला दिसून येत आहे आणि मतदार राजांनी मिंधे गटाला जोरदार धक्का दिला आहे हे आता आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. लोकसभा निवडणुकीत महा विकासआघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार राजेश्री पाटील यांचा जवळपास 95 हजार मतांनी पराभव केला आहे.
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात एकूण 6 विधानसभा येतात या सहाही विधानसभेत महायुतीचे उमेदवार आहेत. या सहापैकी चार विधानसभेत भाजपा, प्रत्येकी एक मतदार संघात शिंदे गट आणि अजित पवार गट असे आमदार आहेत. असे असूनही शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा निवडणुकीत मारलेली जोरदार मुसंडी ही विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार यांच्या विजयाची नांदी ठरत असून महायुतीच्या उमेदवारांसाठी ‘धोक्याची घंटा’ ठरत आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज्यातील प्रमुख पक्षामध्ये फूट पडली. त्याचे परिणाम जिल्ह्यातही दिसून आले. ही फाटाफूट झाल्यानंतर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक झाली. यात शिंदे गट विरूद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशी लढत झाली. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मतदारांची पसंती मिळाली. केवळ पुसद मतदार संघात काठावरचे यश मिळाले. लोकसभेतील निकालावरून हे चित्र स्पष्ट झाले आहे.
यवतमाळ मध्ये महायुतीला का नाकारले
ज्या पद्धतीने मिंधे आणि अजित पवार यांनी आपलाच पक्ष फोडून एक प्रकारे गद्दारी केली, हे जनतेला फारसे रुचले दिसत नाही. या पक्षातून त्या पक्षात अशा कोलांटउड्या मारण्याचे प्रकार अनेक नेते करतात… अर्थात, त्यामागे आपण विजयी होऊ हाच हेतू असतो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काही आयाराम आणि गयारामांचं काय झालंय? यापैकी बहुतांश उमेदवारांना जनतेने नाकारले. निवडणुकीच्या आधी मोठ्या झोकात पक्ष बदलले, उमेदवाऱ्या घेतल्या आणि जोरकस प्रचारही केला… मात्र निकालात त्यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लागण्याऐवजी, त्यांच्या पदरात पराभवाची धूळ पडली आहे.
ज्या पद्धतीने भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हे केला आणि शिवसेना मिंधे गटाच्या भावना गवळी यांना तिकीट नाकारून ऐनवेळी राजेश्री पाटील यांना तिकीट दिले. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचार करून मोदींचा खोटा चेहरा जनतेसमोर आणला. याचमुळे महायुतीच्या राजेश्री पाटील यांचा दारुण पराभव झाला. जनतेने मोदी सरकारचा खरा चेहरा मतदारांनी उघडकीस आणला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे महायुतीचा दारुण पराभव झाला, सहा विधासभेपैकी पाच विधानसभेत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. यानंतर विधानसभेसाठी सर्व्हेची जरुरत एनडीएला पडणार नाही. आता विधासभेचे सर्व उमेदवार बदलणार का असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांना मी विचारतो आहे आणि बदलले किंवा नाही बदलले तरी त्यांचा पराभव नकीच आहे हे जनतेने दाखवून दिले आहे, असं मत यवतमाळचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, काँग्रेसचे राहुल ठाकरे म्हणाले.