मुंबई विमानतळावरील शिवरायांचा पुतळा बंदिवासातून मुक्त करा, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचा अदानी व्यवस्थापनाला इशारा

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. मुंबई विमानतळावरील महाराजांचा पुतळा बंदिवासातून मुक्त करा. पुतळय़ाकडे जाणारा पत्रे लावून बंद केलेला मार्ग तत्काळ खुला करण्यात यावा. यापुढे अदानी समूहाची मुजोरी सहन केली जाणार नाही, असा इशारा एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने अदानी व्यवस्थापनाला दिला आहे. तसेच शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहाची कंपनी असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम करत असताना टर्मिनल-1 येथील एनबीटी कार्गो विभागामध्ये सुमारे 37 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा अडगळीत टाकून बंदिवासात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिवप्रेमींकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धडक देत अदानी प्रशासनाला जाब विचारण्याचा आणि पुतळय़ाकडे जाणाऱ्या मार्गावर उभारलेला पत्र्याचा गेट तोडण्याचा प्रयत्न केला, पण अदानीच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले. दरम्यान, एसीपी फर्नांडिस आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सानप यांनी अदानी व्यवस्थापनाशी या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसांत पुतळा पुनर्स्थापनेचा निर्णय झाला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल असा ऩइशारा लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष उल्हास बिले, सरचिटणीस प्रशांत सावंत, सह सरचिटणीस प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष अमोल कदम, अजित चव्हाण, सतीश शेळके, राजेंद्र भिसे उपस्थित होते.