उदगीर : शिवसेनेचा शेतकऱ्यांना आधार, सहा ठिकाणी शेतकरी मदत केंद्र सुरू

सामना प्रतिनिधी । लातूर

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पार्श्वभूमीवर शिवसेना सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आहे . त्याच भावनेतून पक्षाच्या वतीने शेतकरी मदत व आधार केंद्र सुरू करण्यात आले आहेत. उदगीर तालुक्यातही मंगळवारी अशी एकूण सहा ठिकाणी असे केंद्र सुरू करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याचबरोबर पिक विमा केंद्राचाही शुभारंभ करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पासून तर शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी शिवसेनेने सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. वेळप्रसंगी आंदोलन आणि संघर्ष सुद्धा करण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जावून शेतकऱ्यांना आधार दिला. ठिकाणी चारा छावण्या सुरू व्हाव्यात यासाठीही प्रयत्न केले. शासनाबरोबरच पक्षाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शेतकरी मदत आधार केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उदगीर तालुक्यात हाळी, जळकोट, नळगीर, देवर्जन, तोंडार, लोहारा या सहा ठिकाणी शेतकरी आधार केंद्र मंगळवारपासून सुरू करण्यात आले. याशिवाय जिल्हा परिषद गटनिहाय शिवसेना संपर्क कार्यालयाचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी शेतकऱ्यांना पिक विम्या बरोबरच शेती संदर्भातल्या विविध योजनांची माहिती करून दिली जाणार आहे. त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम शिवसेनेच्या या मदत केंद्रातून केले जाणार आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने हे मदत केंद्र आणि संपर्क कार्यालय आधार ठरतील असा विश्वास लातूरचे संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि शेतकरी हे एक अतूट नाते आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील बळीराजा संकटात सापडतो त्यावेळी सत्तेत असो किंवा बाहेर पक्षाने कायम शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला असल्याचे विधानसभा संपर्कप्रमुख ऍड श्रीनिवास क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख , नामदेव चाळक, उपजिल्हाप्रमुख प्रा. रामचंद्र आदावळे, तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, तालुका संघटक विकास जाधव, युवासेना तालुकाप्रमुख उपेंद्र काळेगारे यांच्या उपस्थितित व सर्व उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.