
बाजारात आपण एखादी वस्तू खरेदी करताना सर्व बाजूने विचार करून खरेदी करतो. तसेच मतदान करताना देखील चौकस बुद्धी ठेऊन मतदान करावे लागते. विकासकामे करून दाखवावी लागतात. ती बोलल्याने किंवा फेकाफेकी केल्याने होत नसतात. बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.
बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी डोंगरपट्ट्यात कॉर्नर बैठका घेऊन रान उठवले आहे. आज बोरफडी येंथे ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, राणा डोईफोडे, बप्पासाहेब घुगे, अरूण डाके, सखाहरी गदळे, व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, डोंगरपट्ट्यातील बोरफडी येथील या गावातील ग्रामस्थांनी जेव्हा जेव्हा विकासाच्या कामाची मागणी आणि हट्ट धरला. तेव्हा तेव्हा त्यांच्या या विकासाच्या मागणीला प्राधान्य देण्याचे काम आपण केले. शिक्षण, आरोग्य आणि डोंगरी भागाचा जो विकास असतो तो विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम आपण केले. जे खाते मला मिळाले त्या खात्याच्या माध्यमातून जनतेला आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे काम आपण केले. या भागातील जनतेचा आपण नेहमीच आदर केला आहे. या निवडणुकीत आपल्याला संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याचे काम आपण करू. या भागातील ऊसतोड मजूर हातात कोयता घेऊन जीवन जगतो. तो कोयता घेणारा शेतकरी बागायतदार झाला पाहिजे. विकासकामे जलदगतीने करायची असतील तर सोंगंढोंगं करणाऱ्यांना बाजूला सारा, गट तट विसरून धनुष्यबाणाला मतदान करा,विकास बोलून होत नाही तो करून दाखवावा लागतो असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
तत्पूर्वी आपल्या भाषणामध्ये बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे म्हणाले, आपला हक्काचा माणूस आमदार होणार आहे. पुन्हा मंत्रिमंडळामध्ये जाणार आहे. त्या जयदत्त क्षीरसागरांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभे राहायचे आहे. शिवसेनेच्या नावावर जे मोठे झाले त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. त्या सर्व एकत्र येऊन शिवसेनेचा अपप्रचार करत आहेत. शिवसेनेचा अपप्रचार करणाऱ्याची शिवसैनिक वाट लावत असतो. शिवसैनिकांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आहे. जिवाचे रान करून जयदत्त क्षीरसागरांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे. खांद्यावर बाण घेतलेल्या जयदत्त क्षीरसागरांना थेट मंत्रालयामध्ये पाठवायचे आहे. त्यासाठी आपण मदतीचा खारीचा वाटा उचला असे आवहन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला डी.एस.कदम, अरूण बोंगाने, सारहेबराव पोकळे, परमेश्वर घुमरे, तात्या डोईफोडे आदी उपस्थित होते.




























































