
खोणी ग्रुप ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे. सरपंचपदी ज्योती जाधव यांची बिनविरोध निवड झाली असून शिवसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोषात दिवाळी साजरी केली. जाधव यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून खोणी व परिसरातील विकासकामे जलद गतीने मार्गी
लावण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
नवनिर्वाचित सरपंच ज्योती जाधव यांच्या सन्मानासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसैनिकांसह अनेक पदाधिकारी तसेच खोणीमधील ग्रामस्थही उपस्थित होते. यावेळी बोलताना म्हात्रे यांनी सांगितले की, शिवसेनेचा भगवा येथे फडकल्याचा हा शुभशकुन असून विजयाची वाटचाल यापुढेही सुरूच राहील. तसेच खोणीमधील सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खोणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मनसेने केलेल्या या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. जिल्हा संघटक तात्या माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, विधानसभा संघटक सदाशिव गायकर, उपतालुकाप्रमुख मुकेश भोईर, परेश पाटील, किरण पाटील, नेताजी पाटील, युवासेना तालुकाप्रमुख जयेश म्हात्रे आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी केले अभिनंदन
खोणी ग्रुप ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून दिली. ही आनंदवार्ता समजताच उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित सरपंच ज्योती जाधव यांचे फोनवर अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी काळात अधिक जोमाने काम करा आणि खोणीच्या विकासासाठी व तेथील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.





























































