
आपल्याला धोका आपल्याच लोकांनी दिला. त्यांना आपलं समजलो, घरचं समजलो पण असं असूनदेखील धोका देतात तेव्हा वाईट वाटलं. आता काही राजकीय पक्षांचा मुंबईवर डोळा आहे, पण मुंबईला मी नजर लावू देणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिला.
माहीममध्ये आयोजित केलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. माहीम विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे सदा सरवणकर यांचा त्यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. सरवणकर यापूर्वी एकदा शिवसेनेशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये गेले होते. नंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्याचा संदर्भ देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एकदा गद्दारी केली तर माफ केलं, दुसऱ्यांदा गद्दारी केली त्याचे काय? अशा गद्दारांना विधान भवनाची पुन्हा पायरी चढू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बंडखोर आमदारांचा समाचार घेताना ते म्हणाले की, रिक्षाचालक, पानटपरी चालवणाऱयांना आपण मोठे केले.
कृषीमंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी केली आहे त्याचा उल्लेख करीत आदित्य ठाकरे म्हणाले की, इकडे पाऊस पडत नाही आणि कृषीमंत्री तिकडे नाचगाण्यात मजा करीत आहे. पाऊस नसल्याने पाणी पुरवठा होतो की नाही याकडे दुर्लक्ष करून पाणी पुरवठा मंत्री तिकडे मजा करताहेत.
एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्याचा उल्लेख करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात हलताना दिसत आहेत, असा टोला त्यांनी शिंदे यांना मारला. या मेळाव्याला दादर, माहीम, नायगाव भागांतील शेकडो शिवसैनिक आणि महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
दादर शिवसेनेचेच!
यावेळी आदित्य ठाकरे यांनी दादर कोणाचे असा सवाल केला. त्यावर ‘दादर शिवसेनेचे’ असे शिवसैनिकांनी एका सुरात सांगितले. त्यानंतर वातावरण कोणाचे, असा दुसरा प्रश्न केला त्यावर ‘शिवसेनेचे’ असा जोरदार जयघोष शिवसैनिकांनी केला.


























































