Video – शिवसेनेचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कानडी पोलिसांची धक्काबुक्की

2311

आतापर्यंत हर एक प्रकारे मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करणाऱ्या कर्नाटक सरकारने दरवर्षी भरविण्यात येणारी मराठी साहित्य संमेलने यावेळी घेऊ दिली नाहीत. आज तर थेट हुतात्मा दिन उधळून लावणाऱ्या या कर्नाटक सरकारने अत्याचाराची परिसीमाच गाठली. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावमध्ये आलेले शिवसेनेचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कानडी पोलिसाकडून धक्काबुक्की करण्यात आली. यड्रावकरांना पोलिसांनी अभिवादन देखील करू दिले नाही. शिवाय हुतात्मा चौकातील हुतात्म्यांचे फलक दुपारनंतर दडपशाहीने काढून कानडी पोलिसांनी हुतात्म्यांचा अवमानाचा कहरच केला. कर्नाटक सरकारच्या या मस्तवालपणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळु लागली आहे.

भाषावार प्रांत रचनेच्या नावाखाली बेळगाव, निपाणी,बिदर,भालकीसह 856 मराठी भाषिक गावे जबरदस्तीने तत्कालीन म्हैसूर राज्यात घुसडण्यात आली. दि.16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तशी आकाशवाणीवर घोषणा केली. दिडशे वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची नुकतीच सुटका झाली असतानाच, आता परत परभाषिक मुलखात इच्छेविरुद्ध जावे लागणार असल्याने,बेळगावसह सीमाभागात आगडोंब उसळला. दुस-याच दिवशी दि.17 जानेवारी रोजी सीमाबांधव रस्त्यावर उतरले असता कानडी पोलीसांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये पैलवान मारूती बेन्नाळकर सह चार जण बेळगावात हुतात्मा झाले. तर दि.18 जानेवारीला निपाणीत कमळाबाई मोहीते यांनी हौतात्म्य पत्करले. मराठी भाषिक सीमाभागात दरवर्षी या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.

शुक्रवारी सकाळी बेळगांव येथील हुतात्मा चौकात या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या चौकातून मुक फेरी काढण्यात आली.कंग्राळी येथेही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव,निपाणी,बिदर,
भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा निर्धारही यावेळी हुतात्म्यांना स्मरुण करण्यात आला. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीचे अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, बंडु केरवाडकर, दिलीप बैलूरकर, अरविंद नागणुरी, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किणेकर आदी मराठी भाषिक सीमा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून सीमाभागात मराठी भाषिकांची जाणीवपूर्वक गळचेपी करण्यात येऊ लागली आहे. मध्यवर्ती एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर बंदुकीतून गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्या तथाकथित भुरट्या नेत्यांमुळे वातावरण बिघडले असताना त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी कानडी पोलिसांकडून मराठी भाषिकांवरच जोर जबरदस्ती करण्यात येऊ लागली आहे. त्याचाच भाग म्हणून दरवर्षी बेळगाव परिसरात होणारी मराठी साहित्य संमेलने दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्रातून येणाऱ्या साहित्यिकांनाही येण्यास पूर्णतः मज्जाव करण्यात आला .परंतु मराठी भाषिक जनतेने ही नियोजित साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली.

दरवर्षीप्रमाणे आजही सीमाभागात हुतात्मा दिनी हुतात्म्यांना शांततेत अभिवादन करण्यात आले.परंतु यासाठी महाराष्ट्रातून एकही लोकप्रतिनिधी येऊ नये म्हणून सकाळपासूनच कोगनोळी टोलनाक्या पासून कानडी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे शिवसेनेचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एसटीने बेळगाव मध्ये दाखल झाले.तर रिक्षातून ते हुतात्मा चौकात अभिवादनासाठी आले असता,कानडी पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आली. राज्यमंत्री असल्याचे सांगून सुद्धा कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने अरेरावी केली. तसेच जबरदस्तीने मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन अज्ञात स्थळी सोडून देण्यात आल्याचे सांगितले.परंतु सायंकाळी उशिरापर्यंत मंत्री पाटील यांचा फोन लागत नसल्याने सीमा भागातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यातच कानडी पोलिसांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांचे फलक ही हटविण्याचे महापाप केले.

आपली प्रतिक्रिया द्या