देशावरील हल्ल्याचा बदला हिंदुस्थानी सैन्य कशा प्रकारे घेऊ शकते हे जगाला दाखवून दिलं! – संजय राऊत

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले. त्यानंतर सरकारने एक सर्वपक्षीय बैठक घेतली आणि सगळ्यांना आमंत्रित केले. त्या बैठकीला शिवसेना उपस्थित नव्हती. आधी कारवाई करा, हल्ला करा त्यानंतर एकत्र येऊन चर्चा करू ही शिवसेनेची भूमिका होती. कारण तेव्हा देशात आक्रोश होता, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. दिल्लीमध्ये बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आता हिंदुस्थानी सैन्याने एक जबरदस्त कारवाई केली आहे. त्या कारवाईचे पडसाद जगभर उमटले असून हिंदुस्थानी सैन्याची ताकद काय आहे आणि हिंदुस्थानी सैन्य आमच्या वरील हल्ल्याचा बदला कशा प्रकारे घेऊ शकते हे त्यांनी जगाला दाखवले. सरकारने कशा प्रकारचा बदला, कधी घ्यायचा ही जबाबदारी हिंदुस्थानी सैन्यावर सोपवली आणि हिंदुस्थानी सैन्याने ते करून दाखवले. त्यामुळे आजची सर्वपक्षीय बैठक त्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहू.

शिवसेनेने कालच्या कारवाईचे स्वागत गेले आहे. हिंदुस्थानी सैन्याने गर्व वाटेल अशा प्रकारची कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या कारवाईनंतर जी परिस्थिती देशात आणि सीमेवर निर्माण होते ती अधिक गंभीर असते. त्याच्यावरती सरकारचा पुढला प्लॅन काय आहे यावर बैठकीत चर्चा करू. कारण गेल्या 72 तासांमध्ये पूंछ, राजौरी या सीमेवरील गावांमध्ये पाकिस्तानी सैन्य अंदाधुंद गोळीबार करत आहे. आतापर्यंत 10 च्या आसपास निरपराध माणसं मारली गेली आणि 50 च्या आसपास जखमी झाले. घरांचे नुकसान झाले, असे राऊत म्हणाले.

हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या नागरी वस्त्यांवर आर्मी कॅम्पवर हल्ले केले नाही तर दहशतवादी तळांवर केले. पण पाकिस्तान हा नापाक देश असल्याने त्यांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वप्रथम काश्मीरच्या नागरिकांचे रक्षण करणे आणि सरकार त्यांच्या पाठीशी आहे हे दाखवून देणे गरजेचे आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

पाकिस्तानी सैन्याला चरित्र आणि चारित्र्यही नाही

हिंदुस्थानी सैन्य जगातील सर्वात प्रोफेशनल सैन्य आहे. ती खोगीर भरती नाही. पाकिस्तानी सैन्याला चरित्र आणि चारित्र्यही नाही. भ्रष्ट आणि व्यभिचार ही त्यांची ओळख आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर बलात्कार करणारे सैनिक ज्या सैन्यामध्ये आहेत, त्यांचे चरित्र काय आणि ते आमच्याशी काय लढणार. त्यामुळे हिंदुस्थानच्या सीमा आणि त्यापेक्षा देशाची अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असते. त्याकडे पाहणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

पाकड्यांची समोरासमोर लढण्याची ताकद नाही

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे सूत्रधार पाकिस्तानचे आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तान आणि त्याच पाकिस्तानवर हल्ला करून 70 च्या आसपास दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला ही बदल्याची सुरुवात आहे. इथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांनीही हिंदुस्थानविरुद्ध बंदुक हाती घेतली होती. ते इथे घुसले असतील आणि लोकांना मारून गेले असतली. त्यामुळे पुढच्या कारवाईसाठी आपण हिंदुस्थानी सैन्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असेही राऊत म्हणाले. तसेच पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पाठबळ देणारा देश आहे. दहशतवादी हेच त्यांचे सैन्य आहे. सीमेवरचे सैन्य समोरासमोर हिंदुस्थानी सैन्याशी लढू शकत नाही ते दहशतवाद्यांना हिंदुस्थानला पाठवून लढतात, असेही ते म्हणाले.